काही दिवसांपासून राज्यभर पसरलेल्या थंड हवेमुळे अनेक भागात गारठा जाणवत आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यभरातील तापमानात कमालीची घसरण झाल्याचं दिसत आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट आली आहे. थंडीची ही लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने उत्तर भारतात थंडी तीव्रता वाढली आहे. या थंड वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावरही होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी कडाका वाढला असून किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरले आहे. पुढील काही दिवस राज्यात थंडीची तीव्रती अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. याचा परिणाम प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता आहे.
राज्यात थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता
देशाच्या उत्तरेकडील भागांमध्ये सध्या शीतलहरींचा जोर अधिक वाढलेला आहे. हरियाणातील हिस्सार येथे तापमान थेट 2.5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली आहे. उत्तर भारतात जाणवणाऱ्या या गारठ्याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्रावरही होत असून राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवले जात आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज असून ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ सक्रिय झाल्यामुळे हवामानात चढउतार होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील मंगळवारी थंडीचा कडाका जाणवणार आहे.
थंडीत हार्ट अटॅकचा धोका; हृदयाचे आरोग्य जपा !
सध्या सर्वत्र थंडीचा कडाका पाहायला मिळतोय, अशा परिस्थिती हार्ट अटॅकचा धोका वाढत असतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की वर्षभरातील उष्ण महिन्यांच्या तुलनेत, सर्वात थंड हिवाळ्याच्या महिन्यांत लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30% जास्त असू शकते. हिवाळ्यातील थंडीची लाट केवळ गारवा घेऊन येत नाही, तर ती हृदयविकार असलेल्या लोकांसाठी आरोग्याची गंभीर समस्या निर्माण करू शकते.
हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. थंडीत उबदार कपडे घाला आणि पुरेसे पाणी प्या, कारण पाण्याची कमतरता आणि थंडीमुळे रक्त घट्ट होऊ शकतं. दिवसातून थोडा चाला किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीत राहील. जास्त तेलकट अन्न टाळा, फळे आणि भाज्या खा. धूम्रपान व मद्यपान टाळा. रक्तदाब व साखर वेळोवेळी तपासा. या सवयी अंगिकारल्यास हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.





