महाराष्ट्रातील हवामानात सध्या सातत्याने अनेक बदल पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत हवामान विभागाकडून राज्यातील थंडीबाबत पुन्हा एकदा नवी अपडेट समोर आली आहे. राज्यातील तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली होती. थंडीची लाट ओसरण्यास सुरुवात झाील होती पण आता तापमानात पुन्हा एकदा घसरण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे 18 डिसेंबरचे राज्यातील हवामान नेमके कसे असेल, ते सविस्तर जाणून घेऊ…

राज्यातील थंडीची स्थिती कशी राहणार ?

काही दिवसांत राज्यातील तापमानात घसरण झाली होती. त्यामुळे थंडीची लाट पहायला मिळत होती. ही थंडीची लाट हळूहळू ओसरण्यास सुरुवात झाली होती. पण आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. म्हणजेच थंडीची लाट कायम राहणार आहे. पुढील 3 दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये किमान तापमानात 1-2 अंश सेल्सिअसने हळूहळू घट होईल आणि त्यानंतर 2-3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होईल. पुढील 3 दिवसांत महाराष्ट्र राज्यात कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल आणि त्यानंतर त्यात मोठा बदल होणार नाही.

गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलेले तापमान पाहिले तर मुंबई (सांताक्रूझ) 18.4 अंश सेल्सिअस, मुंबई (कुलाबा) 22.0 अंश सेल्सिअस, गोंदिया 8.6 अंश सेल्सिअस, अहिल्यानगर 9.5 अंश सेल्सिअस, नाशिक 10.4 अंश सेल्सिअस, पुणे 10.9 अंश सेल्सिअस, नागपूर 9.6 अंश सेल्सिअस, मालेगाव 9.8 अंश सेल्सिअस होते. राज्यातील सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे नोंदवले गेले.

देशभरात थंडीची सध्या काय स्थिती ?

18 ते 22 डिसेंबरदरम्यान उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये सकाळच्या वेळी दाट ते अतिदाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये दृश्यता अत्यंत कमी राहण्याची शक्यता असून, उत्तर प्रदेशात रेड अलर्ट तर पंजाब आणि हरियाणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तराखंडसह बिहार, झारखंड, ओडिशा आणि ईशान्य भारतातील काही राज्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भारतावर सध्या सबट्रॉपिकल वेस्टर्ली जेट स्ट्रीम सक्रिय असून, ती समुद्रसपाटीपासून सुमारे 12.6 किलोमीटर उंचीवर ताशी 100 नॉट्स वेगाने वाहत आहे. 19 डिसेंबरपासून हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.