मेक्सिकोच्या सोनारा राज्यात लागलेल्या भीषण आगीमुळे सणासुदीच्या आनंदावर विरजण पडलं आहे. हर्मोसिलो शहरातील एका सुपर मार्केटला भीषण आग लागली आहे. या आगीत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरात ‘डे ऑफ द डेड’ उत्सव सुरु असताना भीषण दुर्घटना घडल्यानं सणाला गालबोट लागलं आहे. या कालावधीत कुटुंबीय त्यांच्या दिवंगत पूर्वजांचं स्मरण करतात. रंगीबेरंगी मिरवणुका काढल्या जातात. पारंपारिक सणाच्या काळातच दुर्घटना घडल्यानं सगळेच शोकसागरात बुडाले आहेत.
23 निष्पाप नागरिकांनी जीव गमावला !
हर्मोसिलो शहरातील एका सुपर मार्केटला भीषण आग लागली आहे. या आगीत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक लहान मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत १० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. बहुतांश मृत्यू विषारी वायूमुळे झाल्याचा संशय आहे. विषारी वायूमुळे अनेकांचा श्वास कोंडल्याची शक्यता आहे. आगीमुळे संपूर्ण सुपर मार्केटमध्ये सर्वत्र धूर पसरला. त्यामुळे श्वास घेण्यास अडचणी निर्माण झाल्या. फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळी पोहोचून मृतदेहांचं परीक्षण सुरु केलं आहे.
दुर्घटनेमागील कारणांचा शोध सुरू
इलेक्ट्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग लागण्याआधी स्फोट झाला होता का, त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी सांगितलं. हा दहशतवादी हल्ला नव्हता, ही बाब हर्मोसिलो नगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे. दुर्घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी सखोल तपास करण्याचे आदेश दिल्याची माहिती सोनाराचे राज्यपाल अल्फोंसो दुराजो यांनी दिली. मृतांमध्ये मुलांची संख्या जास्त असल्यानं ही दुर्घटना अधिक दु:खद असल्याचं दुराजो म्हणाले. त्यांनी सोशल मीडियीवर एक व्हिडीओ जारी करत पीडित कुटुंबियांबद्दल सहवेदना व्यक्त केल्या.
आगीच्या घटनेत बचाव कसा करावा?
आगीच्या घटनेत स्वतःचा आणि इतरांचा बचाव करणे अत्यंत महत्त्वाचे असते. सर्वप्रथम शांतता राखा आणि तात्काळ सुरक्षित ठिकाणी जा. धूर जास्त असल्यास जमिनीच्या जवळ झुकून श्वास घ्या, कारण खालील भागात हवा स्वच्छ असते. ओले कपडे नाक आणि तोंडावर बांधा. विजेचे स्विच बंद करा आणि लिफ्टऐवजी जिना वापरा. आग लागल्यास पाण्याने किंवा अग्निशामक यंत्राने ती विझवण्याचा प्रयत्न करा, पण गॅस किंवा तेलाच्या आगीवर पाणी टाकू नका. घरात असल्यास दारे आणि खिडक्या बंद करून मदतीसाठी सिग्नल द्या. अग्निशमन दलाला तात्काळ कळवा आणि त्यांच्या सूचनांचे पालन करा. सतर्कता आणि तयारी हाच सर्वोत्तम बचाव आहे.





