गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे शेती आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सलग पावसामुळे शेतात पाणी साचले असून खरीप हंगामातील सोयाबीन, भात, मका आणि कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत रब्बी हंगामाच्या सुरूवातीला देखील पावसापासून सुटका होताना दिसत नाही. मोंठा चक्रीवादळामुळे छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत आगामी काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
मोंथा चक्रीवादळामुळे पावसाचा धोका!
महाराष्ट्रात दोन दिवस अवकाळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातील ‘चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्याच्या चारही विभागांत पावसाचा अंदाज आहे. चक्रीवादळाला मोंथा असं नाव देण्यात आलं आहे. बंगालच्या उपसागरात सध्या तयार झालेली प्रणाली 25 ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्यात आणि 27 ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये 27, 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडेल. 26 ऑक्टोबरपासून मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे.
या निर्माण झालेल्या स्थितीचा परिणाम दक्षिण भारतातील राज्यांसह महाराष्ट्रावर देखील होणार आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्र विशेषतः पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यांचे दक्षिणेकडील भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह जोरदार सरी अपेक्षित आहेत. मुंबई, गोवा आणि त्याच्या आसपासच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांतही ढगाळ वातावरण राहून, विजांच्या कडकडाटासह मान्सूननंतरचा पाऊस हजेरी लावू शकतो. त्यामुळे रब्बी हंगांमाच्या सुरूवातीलाच शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
29 ऑक्टोबरनंतर पावसाची पूर्णपणे उघडीप ?
दरम्यान महाराष्ट्रातील पाऊस 29 ऑक्टोबरनंतर पूर्णपणे उघडीप देईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. 25 ते 29 ऑक्टोबरच्या दरम्यानच्या काळात राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस बरसण्याच्या अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण भारतात 25 ते 28 ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या भागात रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्याचा परिणाम परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होणार आहे.
रब्बी हंगामावर संकट, शेतकरी चिंतेत
सततच्या पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील रब्बीचा हंगाम देखील मागास होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. दरम्यान नैऋत्य मान्सून राज्यातून पूर्णपणे माघारी फिरला आहे. तयार झालेल्या पोषक हवामानामुळे राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये हलक्यातील मध्यम सरींची शक्यता हवामाना विभाग आणि आगामी काळामध्ये वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती कामाचे नियोजन करावे असं आवाहन देखील करण्यात आला आहे. शेतकरी सध्या चिंतेत आहेत.






