Weather Update: बुधवारी महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून 5 जिल्ह्यांसाठी अलर्ट

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रातील पावसाबाबत हवामान विभागाकडून आता मोठा अपडेट समोर आली आहे. कारण, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत बुधवारी वादळी पावसाची शक्यता आहे. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Weather Update: बुधवारी महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून 5 जिल्ह्यांसाठी अलर्ट

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. 7 नोव्हेंबरपर्यंत राज्यात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. तर 5 नोव्हेंबरसाठी पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस 7 नोव्हेंबर नंतरच पुर्णपणे उघडीप घेईल, अशी शक्यता या निमित्ताने निर्माण झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता

मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता असून अधूनमधून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.  कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला 5 तारखेसाठी यलो अलर्ट तर सहा तारखेला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याला हवामान विभागाने 5 नोव्हेंबरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे वगळता चारही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यामध्येही तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित परभणी, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये मात्र पावसाने काढता पाय घेतला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसासाठी कोणताही इशारा दिलेला नसून सामान्यतः कोरडे हवामान पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

7 नोव्हेंबरनंतर पावसाची उघडीप?

नोव्हेंबर महिना उजाडला तरी राज्यात थंडीचा काही नामोनिशाण दिसत नाहीये. येता जात पडणाऱ्या पावसामुळे सामान्य नागरिक हैराण झाले असून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात थंडीची चाहूल सहा नोव्हेंबरनंतरच लागेल . अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही ठिकाणी 7 नोव्हेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 7 ते 8 नोव्हेंबरनंतर हवामान कोरडे होऊन थंडीची चाहूल लागण्याचा अंदाज हवामाना तज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस खऱ्या अर्थाने 7 नोव्हेंबरनंतरच उघडीप घेईल, अशी शक्यता निर्माण झालेली आहे.