राज्यासाठी गुड न्यूज; लवकरच धावणार दोन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस

Written by:Rohit Shinde
Published:
वंद भारत एक्स्प्रेसमुळे प्रवासाचा बराच वेळ वाचत असतो, राज्यात आता लवकरच दोन नव्या मार्गांवर वंदे भारत एक्प्रेस धावण्याची शक्यता आहेत. याबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
राज्यासाठी गुड न्यूज; लवकरच धावणार दोन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात लवकरच दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू होणार आहेत. या गाड्या दोन वेगवेगळ्या मार्गांवर धावणार असल्याची माहिती आहे, या गाड्यांमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि महाराष्ट्रातील रेल्वे नेटवर्क अधिक मजबूत होईल, प्रवासाला गती आणि सुविधा मिळेल. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यापासून प्रवाशांची पसंती मिळताना दिसत आहे.

नागपूर-मुंबई आणि पुणे-नागपूर धावणार एक्स्प्रेस

याबाबत जी माहिती समोर येत आहे त्यानूसार, पुणे-नागपूर आणि मुंबई-नागपूर या दोन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे. या दोन्ही मार्गांसाठी आवश्यक रेल्वे ट्रॅक चाचणी नुकतीच पूर्ण झाली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी सांगितले की, अंतिम अहवाल मिळाल्यानंतर या मार्गांवर वंदे भारत गाड्या सुरू केल्या जातील. राज्यातील आजच्या स्थितीचा विचार केला असता सध्या महाराष्ट्रातून 11 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. आणखी दोन गाड्या वाढल्याने हा आकडा 13 वर जाईल.

सध्या वंदे भारत एक्प्रेस सीएसएमटी-जालना, सीएसएमटी-मडगाव, सीएसएमटी-सोलापूर, सीएसएमटी-शिर्डी, मुंबई सेंट्रल-गांधीनगर, मुंबई सेंट्रल-अहमदाबाद, नागपूर-बिलासपूर, नागपूर-इंदोर, नागपूर-सिकंदराबाद, पुणे-कोल्हापूर आणि पुणे-हुबळी या मार्गांवर धावत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार यासंदर्भात काही खासदार आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांच्यात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. नव्या वंदे भारतबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे.

वंदे भारतमुळे प्रवाशांची सोय होणार

पुणे-नागपूर आणि मुंबई-नागपूर मार्गांवर वंदे भारत गाड्या सुरू झाल्यास प्रवाशांचा 1 ते 1.5 तास वेळ वाचेल, असा दावा केला जात आहे. या गाड्यांमुळे दोन्ही महत्त्वाच्या शहरांमधली प्रवाशांचा प्रवास अतिशय जलद आणि आरामदायी होईल. सध्या पुण्यातून तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावतात. पुणे-नागपूर मार्गावरील नवीन गाडी सुरू झाल्यास पुण्यातून धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांची संख्या चारवर पोहोचेल. प्रस्तावित नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी आठवड्यातून सहा दिवस चालवली जाईल, अशी माहिती आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर ही राज्यातील महत्वाची शहरे आहेत, या दरम्यान उत्तम दळणवळण असणं अत्यंत गरजेचं असतं. त्या दृष्टीने हे  महत्वाचं पाऊल असेल, असं सांगितलं जात आहे.