MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

मुंबईकरांनो, इकडे लक्ष द्या! 87 तास पाणीबाणी, कोणत्या भागाला फटका बसणार ?

Written by:Rohit Shinde
Published:
महापालिकेने स्पष्ट केले आहे की शटडाऊन कालावधीत पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार असल्याने नागरिकांनी अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी पूर्वसाठा करून ठेवणे अत्यावश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा, तसेच आवश्यक गरजांसाठी पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईकरांनो, इकडे लक्ष द्या! 87 तास पाणीबाणी, कोणत्या भागाला फटका बसणार ?

मुंबई शहरातील सतत सुरू असलेल्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अनियमित पाणी येणे, कमी दाबाने पुरवठा होणे किंवा पूर्णपणे पुरवठा बंद राहणे यामुळे दैनंदिन कामात अडथळे निर्माण होत आहेत. पिण्याच्या पाण्यापासून स्वच्छतेपर्यंत सर्वच गोष्टींवर परिणाम होत आहे. अनेक भागांमध्ये नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने त्रास आणि खर्च वाढतो आहे. अशा परिस्थितीती आता अचानक आता मुंबईकरांची डोकेदुखी वाढविणारी अशी एक बातमी समोर आली आहे. कारण, पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत होणार आहे.

मुंबईतील पाणीपुरवठा विस्कळीत होणार

मुंबई महानगरपालिकेकडून जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या कामासाठी 2400 मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळविण्यात आलेल्या भागाचे छेद – जोडणी (क्रॉस – कनेक्शन) चे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिकांना पाणीपुरवठ्यात कमीतकमी अडथळा येईल, यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे.

जी उत्तर, के पूर्व विभाग आणि एच पूर्व विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. ही कार्यवाही सोमवार, 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून शुक्रवार, 26 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीनंतर 1 वाजेपर्यंत (एकूण 87 तास) सुरु राहणार आहे. परिणामी, जी उत्तर, के पूर्व आणि एच पूर्व विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसेच, नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेतदेखील बदल होणार आहे. सोमवार, 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून शुक्रवार, 26 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीनंतर 1 वाजेपर्यंत जलवाहिनी जोडणीची कामे सुरु राहणार आहेत. त्यामुळे जी उत्तर, के पूर्व आणि एच पूर्व विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे पालिकांचे आवाहन

महापालिकेने स्पष्ट केले आहे की शटडाऊन कालावधीत पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार असल्याने नागरिकांनी अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी पूर्वसाठा करून ठेवणे अत्यावश्यक आहे. पाण्याचा अपव्यय टाळावा, तसेच आवश्यक गरजांसाठी पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा समतोल राखण्यासाठी 8 डिसेंबरपर्यंत झोनिंग पद्धतीने शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. काही भागांमध्ये संपूर्ण दिवसभर कमी दाबाचा तर काही भागांमध्ये काही वेळ पाणीपुरवठा बंद ठेवून वितरण व्यवस्थेचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.