उत्तर भारतात सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम आता थेट तुमच्या दारापर्यंत पोहोचला आहे. 4 जानेवारी, रविवारी महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल होणार आहेत. मुंबईत ढगाळ वातावरण असेल, तर पुण्यात धुक्याचा वेढा पाहायला मिळेल. जाणून घ्या आजचे हवामान नेमके कसे असेल आणि कुठे थंडीचा सर्वाधिक परिणाम जाणवेल…महत्वाची बाब म्हणजे राज्यावर ऐन थंडीच्या दिवसांत अवकाळी संकट घोंघावत आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील रविवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ. काही ठिकाणी ऊन देखील वाढताना दिसत आहे. त्यामुळे एकूणच संमिश्र अशा स्वरूपाचे हवामान सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.
मुंबई-पुण्यात हवामान कसे असेल ?
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि उपनगरांमध्ये रविवारी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी जाणवेल, मात्र आर्द्रतेमुळे हवेत थोडासा दमटपणा जाणवू शकतो. मुंबईत कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात वाऱ्याचा वेग किंचित वाढलेला असेल. पुणे शहरात रविवारी आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. मात्र, पहाटेच्या वेळी विरळ धुके पडण्याची शक्यता असल्याने वाहनधारकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सूर्यप्रकाशित आणि कोरडे हवामान राहील. उत्तर महाराष्ट्रात, विशेषतः नाशिक आणि जळगाव परिसरात थंडीचा प्रभाव अधिक असेल.
मराठवाडा-विदर्भातील हवामानाचा अंदाज
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही हवामानात बदल जाणवत आहेत. नाशिकमध्ये कमाल तापमान 29 अंश, तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान 29 अंश आणि किमान तापमान 15 अंशांच्या आसपास राहील. विदर्भात नागपूरमध्ये किमान तापमान 14 अंशांपर्यंत वाढले असून ढगाळ वातावरण काही भागांत कायम राहण्याची शक्यता आहे. तरीही या विभागांत पहाटेच्या वेळी गारवा जाणवत राहील. एकंदरीत पाहता, 4 जानेवारी रोजी महाराष्ट्रात थंडीचा कडाका कमी होत असला तरी हिवाळ्याची चाहूल अद्याप कायम राहणार आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ दिसून येत असून पुढील काही दिवस हीच स्थिती टिकून राहण्याची शक्यता आहे. दिवसाच्या वेळेत उबदार वातावरण, तर पहाटे आणि रात्री सौम्य गारवा असा मिश्र हवामानाचा अनुभव राज्यभरात जाणवणार आहे.





