राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन ते तीन दिवस विविध जिल्ह्यांत पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मान्सून देशातून पुढील काही दिवसांत माघार घेईल असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
ऐन दिवाळीत पाऊस बरसणार?
आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता आहे. राज्यात 19 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. ऐन दिवाळीत पावसाची शक्यता असल्याने याचा फटका अनेकांना बसणार आहे. सध्या पश्चिम – मध्य अरब समुद्रात सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागरात देखील दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यात 19 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 19 ऑक्टोबरपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आला आहे.
काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढला होता. रत्नागिरी येथे तब्बल 35.5 अंश सेल्सियस, तर जळगाव, सोलापूर, ब्रह्मपुरी आणि अमरावती येथे 34 अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात आले. मात्र आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेणार !
तर दुसरीकडे 15 ऑक्टोबरनंतर राज्यातून मान्सून माघार घेणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्यातून मान्सून माघार घेत असल्याने काही दिवस आकाश ढगाळ राहणे आणि तुरळक ठिकाणी सरी बरसण्याची शक्यता आहे. देशातून नैऋत्य मोसमी पावसाचा निरोप दोन दिवसांत होणार आहे. सोमवारी बहुतांश महाराष्ट्रातून मॉन्सून माघारी फिरला असून लवकरच दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होणार आहेत. त्यामुळे आगामी दिवसांत राज्यात आकाश ढगाळ राहणे आणि तुरळक ठिकाणी सरी बरसण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Thunderstorm accompanied with lightning , light to moderate rain , gusty winds 30 -40 kmph very likely to occur at isolated places over South Madhya Maharashtra and Marathwada.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/PxvBkKEaVc
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 14, 2025





