देशभरात खरंतर रेकॉर्ड ब्रेक थंडी पाहायला मिळत आहे. राज्याच्या बहुतांश भागात सध्या तीव्र शीतलहरीचा प्रभाव जाणवत असून अनेक ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले आहे. पहाटे आणि रात्रीच नव्हे तर दिवसभर वातावरणात गारठा कायम असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्र आणि अहिल्यानगर येथे 5.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात 7.5 अंश सेल्सिअस तापमान होते.
बुधवार, 24 डिसेंबरचे हवामान कसे असेल ?
राज्यात सध्या हवामानात चढ-उतार सुरू असले तरी बहुतांश भागांमध्ये थंडीची लाट कायम आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर परिसरासह विदर्भात थंडीचा कडाका पुढील काही दिवस टिकून राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज 24 डिसेंबर रोजीही राज्यातील किमान तापमानात मोठी वाढ होणार नसल्याचे संकेत आहेत.
उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावरही होताना दिसत आहे. मंगळवारी 23 डिसेंबर रोजी पंजाबमधील गुरुदासपूर येथे देशातील सपाट भूभागावरील नीचांकी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याच कालावधीत केरळमधील कोट्टायम येथे 35.5 अंश सेल्सिअस इतके देशातील उच्चांकी तापमान नोंदवले गेले. महाराष्ट्रात कोकणातील रत्नागिरी येथे 33 अंश सेल्सिअस हे राज्यातील सर्वाधिक तापमान राहिले.
आज 24 डिसेंबर रोजी थंडीची लाट काही प्रमाणात ओसरलेली दिसत असली, तरी थंडीचा कडाका कायम राहणार आहे. पुढील 2 दिवसांत काही भागांमध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर कमाल तापमानातही सतत चढ-उतार होत राहण्याचा अंदाज आहे.
कोकण विभागात थंडीचा प्रभाव तुलनेने कमी असला, तरी गारवा जाणवणार आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून किमान तापमानात सुमारे 1 अंश सेल्सिअसने घट होऊ शकते. मुंबईत कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.
थंडीत हार्ट अटॅकचा धोका; हृदयाचे आरोग्य जपा !
सध्या सर्वत्र थंडीचा कडाका पाहायला मिळतोय, अशा परिस्थिती हार्ट अटॅकचा धोका वाढत असतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की वर्षभरातील उष्ण महिन्यांच्या तुलनेत, सर्वात थंड हिवाळ्याच्या महिन्यांत लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30% जास्त असू शकते. हिवाळ्यातील थंडीची लाट केवळ गारवा घेऊन येत नाही, तर ती हृदयविकार असलेल्या लोकांसाठी आरोग्याची गंभीर समस्या निर्माण करू शकते.
हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. थंडीत उबदार कपडे घाला आणि पुरेसे पाणी प्या, कारण पाण्याची कमतरता आणि थंडीमुळे रक्त घट्ट होऊ शकतं. दिवसातून थोडा चाला किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीत राहील. जास्त तेलकट अन्न टाळा, फळे आणि भाज्या खा. धूम्रपान व मद्यपान टाळा. रक्तदाब व साखर वेळोवेळी तपासा. या सवयी अंगिकारल्यास हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.