Weather Update: महाराष्ट्रासाठी पुन्हा धोक्याची घंटा; पुढील 3 दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यावरील पावसाचे संकट काही केल्या दूर होण्याचे नाव घेताना दिसत नाही. पुढील 3 दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Weather Update: महाराष्ट्रासाठी पुन्हा धोक्याची घंटा; पुढील 3 दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी खरिप हंगाम पुरता गमावल्यानंतर आता रब्बी हंगाम देखील सततच्या पावसामुळे संकटात आला आहे. कारण, राज्यावरील पावसाचे सावट काही केल्या दूर होण्याचे नाव घेताना दिसत नाही. पुढील 3 दिवस राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांत या काळात मुसळधार पाऊस बरसेल, असा अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील 3 दिवस पावसाचा धोका कायम

भारतीय हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे,  सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे, आज या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उद्या म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पालघर, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, बुलढाणा, वाशिम, बीड, धाराशिव, लातूर, चंद्रपूर, नागपूर वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

तर 25 ऑक्टोबर रोजी सांगली, सोलापूर, धुळे, नंदूरबार, अमरावती, अकोला, बुलढाणा, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, धाराशीव, जालना बीड, नंदुरबार या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून, पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता असून, या काळात मेघगर्जना देखील होऊ शकते. दक्षिण कोकणातील रत्नागिरी येथे शनिवारपर्यंत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत यलो अलर्ट कायम राहील.

रब्बी हंगामावर संकट, शेतकरी चिंतेत

सततच्या पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील रब्बीचा हंगाम देखील मागास होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. दरम्यान नैऋत्य मान्सून राज्यातून पूर्णपणे माघारी फिरला आहे. तयार झालेल्या पोषक हवामानामुळे राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये हलक्यातील मध्यम सरींची शक्यता हवामाना विभाग आणि आगामी काळामध्ये वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती कामाचे नियोजन करावे असं आवाहन देखील करण्यात आला आहे. शेतकरी सध्या चिंतेत आहेत.

शेती आणि पिकांचे नुकसान होण्याची भीती

शेतकऱ्यांना आधीच पावसाचा मोठा फटका बसला आहे, त्यातच आता अनेक ठिकाणी धानाची कापणी सुरू आहे, तसेच कापसाची वेचणी देखील सुरू आहे, अशा परिस्थितीमध्ये पाऊस पडल्यास त्याचा मोठा फटका हा धान आणि कापसाला बसण्याची शक्यात आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेमध्ये सापडला आहे.