MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

Winter Season: महाराष्ट्रात मंगळवारी थंडीची लाट येणार ; हवामान खात्याकडून इशारा जारी

Written by:Rohit Shinde
महाराष्ट्रात थंडीचा कडाका आता चांगलाच वाढताना दिसत आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. मंगळवारी थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Winter Season: महाराष्ट्रात मंगळवारी थंडीची लाट येणार ; हवामान खात्याकडून इशारा जारी

महाराष्ट्र आणि मध्य भारतात हळूहळू थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात आगामी काही दिवसांत तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. भारतातील हवामानात सतत बदल होत आहेत. सध्या देशभरात वेगवेगळे हवामानाचे प्रकार दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत आता खऱ्या अर्थाने हिवाळ्याची सुरूवात होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.  मंगळवारी महाराष्ट्राच्या विविध भागात थंडीचा जोर अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मंगळवारी राज्यात थंडीची लाट येणार !

राज्यात थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर सगळीकडे निरभ्र आकाश पाहायला मिळत आहे. तर किमान तापमानात घट पाहायला मिळत आहे. मुंबईत देखील रात्रीच्या वेळी हलकी थंडी जाणवत आहे.  मंगळवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यतः निरभ्र राहील. तर कमाल तापमानात वाढ होईल. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहील. कोकणातील इतर जिल्ह्यांमध्येही याच प्रकारचे हवामान पाहायला मिळेल.

पुणेकरांना देखील गुलाबी थंडी अनुभवायला मिळणार आहे. पुण्यातील किमान तापमानात एका अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यात कमाल तापमान 31 तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहील. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत देखील तापमानाची स्थिती अशीच राहील. उत्तर महाराष्ट्रात गारठा सर्वात जास्त आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. 11 नोव्हेंबर रोजी देखील उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. मराठवाड्यात देखील शीत लहर पहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याचे पाहायला मिळाले. 11 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यातील तापमानात 1 अंशाने वाढ होऊ शकते. तर विदर्भात देखील किमान तापमानात लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. यामुळे गारठा वाढला असून नागरिक शेकोट्या पेटवून ऊब घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विदर्भात किमान तापमान 13 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

रब्बी हंगामाच्या कामाला वेग

महाराष्ट्रात हळूहळू वाढणारी थंडी आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. सकाळच्या आणि रात्रीच्या वेळी गारवा वाढल्याने शेतीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. या थंडीमुळे रब्बी हंगामाच्या पिकांची लागवड वेगाने सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी, मका आणि मोहरी यांसारख्या पिकांच्या पेरणीसाठी शेतकरी उत्साहाने काम करत आहेत. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत तापमानात आणखी ३ ते ४ अंशांची घट होईल, असा अंदाज वर्तवला आहे.