आयटीआर म्हणजेच इनकम टॅक्स रिटर्न भरणे प्रत्येक करदात्याची जबाबदारी आहे. आयटीआर भरल्याने आपले उत्पन्न आणि कराची योग्य नोंद सरकारकडे होते. त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणी टाळता येतात. बँकेतून कर्ज घेताना, व्हिसा मिळवताना किंवा मोठ्या गुंतवणुकीसाठी आयटीआर आवश्यक ठरतो. सरकारकडून मिळणाऱ्या विविध सवलती व रिफंडसाठीही आयटीआर महत्त्वाचा आहे. वेळेवर आयटीआर भरल्यास करदात्याची विश्वासार्हता वाढते. तसेच भविष्यातील आर्थिक नियोजन आणि संपत्तीची योग्य नोंद ठेवण्यासाठी आयटीआर उपयुक्त ठरतो. त्यामुळे प्रत्येक करदात्याने आयटीआर वेळेवर आणि प्रामाणिकपणे भरावा हेच योग्य आहे. परंतु हा आयटीआर भरताना काही महत्वपूर्ण बाबींचे पालन आपण करणे आवश्यक आहे.
15 सप्टेंबर आयटीआर भरण्याची शेवटची मुदत
ऑनलाईन फायलिंगमध्ये बदल केल्यामुळे करदात्यांना अधिक वेळ मिळावा म्हणून सरकारने 15 सप्टेंबरपर्यंत आयटीआर भरण्यास मुदतवाढ दिली. ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, जसे की बहुतेक पगारदार कर्मचारी त्यांना ही मुदतवाढ दिली गेली आहे. त्याचवेळी, ज्यांच्या व्यवसाय किंवा आर्थिक नोंदींचे ऑडिट केले जाते त्यांच्यासाठी ITR भरण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. उशिरा दाखल केल्याबद्दल दंड होऊ शकतो आणि काही प्रकरणांमध्ये नोटीस देखील पाठवली जाऊ शकते. म्हणून कोणतीही अडचणी टाळण्यासाठी अंतिम मुदतीपूर्वी तुमचा ITR दाखल करणे शहाणपणाचे ठरेल.
दंड टाळण्यासाठी आयटीआर वेळेत भरा!
15 सप्टेंबरच्या अंतिम मुदतीनंतर ITR दाखल केले तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो, जो तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असेल. म्हणजे तुमचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर 1000 रुपये दंड आणि जर 5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास 5000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. याशिवाय थकबाकी असलेल्या कर रकमेवर दरमहा 1% व्याज देखील भरावे लागेल त्यामुळे, दंड आणि व्याज टाळण्यासाठी वेळेवर ITR दाखल करा.
आयकर विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आयकरात अशा 50 हून अधिक श्रेणी आहेत, ज्यामध्ये करदात्यांना कर सूट मिळते. उदाहरणार्थ, शेतीतून मिळणारे उत्पन्न कलम 10 (1) अंतर्गत सूट आहे, कलम 10 (15) अंतर्गत करमुक्त बाँडवरील व्याज, कलम 56 (2) अंतर्गत नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तू, बचत बँक खात्यात 10,000 रुपयांची व्याज रक्कम कलम 80 टीटीए अंतर्गत सूट श्रेणीत येते. तथापि, सर्व सूट मिळालेल्या श्रेणींना मर्यादा आहेत आणि विभागाने त्यांच्यासाठी वेगवेगळे निकष निश्चित केले आहेत. उदाहरणार्थ, नातेवाईक नसलेल्यांकडून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या भेटवस्तू करपात्र आहेत. म्हणजेच, यावर कर भरावा लागेल.






