कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोअरचे महत्व आजच्या आर्थिक व्यवहारात अत्यंत मोठे आहे. सिबिल स्कोअर हा व्यक्तीच्या कर्ज फेडण्याच्या क्षमतेचा आणि आर्थिक शिस्तीचा दाखला मानला जातो. जर स्कोअर चांगला असेल तर बँका आणि वित्तीय संस्था सहजपणे कर्ज मंजूर करतात तसेच कमी व्याजदराची संधीही मिळते. परंतु स्कोअर कमी असल्यास कर्ज नाकारले जाऊ शकते किंवा जास्त व्याजदर लागू होतो.
वेळेवर हप्ता भरणे, क्रेडिट कार्डचे थकबाकी टाळणे आणि आर्थिक शिस्त राखणे हे स्कोअर सुधारण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे कर्ज घेण्याच्या दृष्टीने सिबिल स्कोअर हे आर्थिक स्थैर्य आणि विश्वासार्हतेचे महत्त्वाचे मापदंड मानले जातात. दुसरीकडे कमी सिबिल स्कोअर असताना कर्ज मिळविण्याचे काही मोजके मार्ग आहेत, अथवा टीप्स आहेत…त्या जाणून घेऊ…
कमी सिबिल स्कोअर; असे मिळवा कर्ज
तुमचा सिबिल स्कोअर कमी असेल तरीही तुम्ही बँकेकडून पर्सनल लोन घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला कमी सिबिल स्कोअरवर बँकेकडून पर्सनल लोन कसे घेऊ शकता याबद्दल सांगणार आहोत. कमी सिबिल स्कोअरवर पर्सनल लोन मिळवण्यासाठी तुम्ही जॉइंट लोन घेऊ शकता. मात्र, यासाठी तुमच्या लोन पार्टनरचा सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे.
अनेक बिगर बँकिंग वित्तीय सेवा देखील लोकांना कमी सिबिल स्कोअरवर कर्ज देतात. अशावेळी तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याऐवजी एनबीएफसीकडून कर्ज घेऊ शकता. तथापि, कमी सिबिल स्कोअर असल्यास, आपल्याला जास्त व्याज दर द्यावा लागू शकतो. कमी सिबिल स्कोअरवर बँकेकडून कर्ज घेण्यासाठी बँकेला तुमच्या उत्पन्नाचा स्थिर स्त्रोत दाखवून कमी रकमेचे कर्ज घ्यावे. अनेकदा चांगल्या आणि स्थिर उत्पन्नावरही बँका कर्ज देतात. त्यामुळे या मार्गाने तुम्ही कर्ज मिळवू शकता.
सिबिल स्कोअर कमी होण्याची कारणे
सिबिल स्कोअर कमी होण्याची अनेक कारणे आहेत. सर्वप्रथम कर्जाचे हप्ते वेळेवर न भरणे हे सर्वात मोठे कारण मानले जाते. क्रेडिट कार्डवरील थकबाकी दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यासही स्कोअर घसरतो. वारंवार कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केल्यास आर्थिक शिस्तीबाबत नकारात्मक छाप पडते. क्रेडिट कार्डचा वापर त्याच्या मर्यादेपेक्षा जास्त केल्यास परतफेडीची क्षमता कमी असल्याचे दिसते. तसेच कर्जाची सेटलमेंट करून पूर्ण परतफेड न करणे, चुकीची बँक माहिती किंवा अपुरा क्रेडिट इतिहास ही देखील कारणे ठरतात. या सर्व गोष्टींमुळे सिबिल स्कोअर कमी होतो आणि भविष्यात कर्ज घेणे कठीण बनते. त्यामुळे तुम्ही या बाबींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.





