मुंबईच्या गृहविक्री क्षेत्राचं अर्थकारण बदलले; घरांच्या किंमती गगनाला भिडल्या!

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबईच्या गृहविक्री आणि गृहनिर्माण क्षेत्राचं चित्र आता बदलत आहे, किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत आता सर्वसामान्यांना घरे परवडेनाशी झाली आहेत.
मुंबईच्या गृहविक्री क्षेत्राचं अर्थकारण बदलले; घरांच्या किंमती गगनाला भिडल्या!

पायाभूत सुविधा, उद्योगसुलभता आणि प्रतिष्ठेचे वलय यांचा एकत्रित परिणाम मुंबईच्या गृहविक्री क्षेत्रातील अर्थकारणावर वर्षानुवर्षे होत आला आहे. आलिशान घरांच्या किमती गगनाला भिडल्या असून आता या किमतींनी सर्व सीमा ओलांडल्या आहेत. सर्वसामान्य माणसांच मुंबईत घर घेण्याचं स्वप्न आता स्वप्नच राहणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई आणि उपनगरांतील घरांच्या किंमती वाढीव स्वरूपात समोर येतात, असा आरोपही काही अर्थतज्ज्ञ करताना दिसतात. मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात आता गृहविक्री आणि गृहनिर्माण क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत.

व्यवहारांचे विक्रम

वरळी सी फेस येथे तब्बल 639 कोटींचा गृहविक्री व्यवहार झाला आहे. वरळी येथे नमन ग्रुपचा ‘नमन झाना’ प्रकल्प सध्या सुरू आहे. या 40 मजली इमारतीमध्ये केवळ 16 घरे आहेत. त्यापैकी 22 हजार 500 चौरस फुटांची दोन ड्युप्लेक्स घरे 639 कोटींना खरेदी करण्यात आली आहेत. प्रति चौरस फूट 2 लाख 80 हजार रुपये दराने या घरांची विक्री झाली आहे. पुढील वर्षी या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आहे.

आतापर्यंत वरळी आणि मलबार हिल येथे झालेल्या आलिशान घरांच्या व्यवहाराच्या दुप्पट किमतीचा व्यवहार नमन झानामध्ये झाला आहे. या ठिकाणी पूर्वी एका पारसी कुटुंबाचा बंगला होता. इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या घराच्या बाजूलाच हा भूखंड आहे. या भूखंडाच्या विक्रीतून मिळालेली रक्कम पारसी कुटुंबीय धर्मादाय संस्थेला दान करणार आहेत.सागरी किनारा नियमन क्षेत्राचे निकष शिथिल केल्यानंतर जी नवी विकासकामे सध्या सुरू आहेत त्यापैकी सर्वाधिक किमतीचे व्यवहार झालेल्या यादीत नमन झानाचे स्थान सर्वांत वरचे आहे. काही वर्षांपूर्वी उदय कोटक यांनी हा भूखंड विक्रमी किमतीत खरेदी केला होता.

सर्वसामान्यांना घर घेणं अशक्य?

मुंबई शहर, उपनगरे आणि आजुबाजुच्या शहरांचं चित्र आता दिवसेंदिवस बदलत आहे. घरांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असली तरी सर्वसामान्य नोकरदार वर्गाला ही घरे परवडणारी नाहीत. शिवाय घरांच्या किंमती वाढीव स्वरूपात समोर येत असल्याची देखील शक्यता आहे. अशा काळात सर्वसामान्याचं मुंबईतच नव्हे तर मुंबईबाहेर घर घेण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिल की काय, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यात मुंबईतील मोक्याची ठिकाणे नरीमन पॉईंट, वरळी सी फेस, जुहू अशा भागांत घरे घेणं निव्वळ अशक्य होत आहे.