भारतावर सायबर हल्ल्यांचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. सायबर हल्ल्यांचं फक्त प्रमाणच वाढलेलं नाही तर भारत सायबर हल्लेखोरांच्या निशाण्यावर आहे. भारतातील वाढत्या सायबर हल्ल्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. तंत्रज्ञानाचा झपाट्याने होत असलेला विकास आणि इंटरनेटचा वाढता वापर यामुळे ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग, डेटा चोरी, बँकिंग फ्रॉड, सोशल मीडिया अकाउंट्स हॅक होणे अशा घटना मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. याबाबत अलीकडेच समोर आलेल्या आकडेवारीमुळे मात्र अनेकांची झोप उडणार आहे.
धक्कादायक, सायबर हल्ल्यात भारत जगात टॉपवर
अलिकडेच, स्विस सायबर सुरक्षा फर्म‘अॅक्रोनिस’च्या अहवालातून असे समोर आले आहे की, सायबर हल्ल्यांच्या यादीत आपला भारत अव्वल स्थानावर आहे. या अहवालात नमूद केले आहे की, भारताने 2025 मध्ये सायबर हल्ल्यांचा सर्वांत मोठा लक्ष्य देश म्हणून ब्राझील आणि स्पेन यांना मागे टाकले आहे. मे महिन्यात, भारतात विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या 12.4 टक्के उपकरणांमध्ये मालवेअर आढळून आले होते. याचा अर्थ असा की, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वापरणाऱ्यांसोबत सायबर गुन्ह्यांच्या सर्वाधिक घटना घडतात आणि याचे जगात सर्वाधिक प्रमाण भारतात आहे. त्यानंतर जूनमध्ये हाच आकडा 13.2 टक्क्यांपर्यंत वाढला होता. हा आकडा जगात सर्वाधिक आहे.
सायबर हल्ल्यांपासून पैसा, माहिती सुरक्षित ठेवा!
जनरेटिव्ह एआयमुळे सायबर गुन्हेगारांसाठीचे टेक्निकल अडथळे कमी झाले आहेत. यामुळे आता फिशिंग ईमेल, बनावट इनव्हॉइस आणि अगदी डीपफेक स्कॅमही शोधणे प्रचंड कठीण झाले आहे. सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम मजबूत आणि गुंतागुंतीचे पासवर्ड वापरणे व त्यात वेळोवेळी बदल करणे गरजेचे आहे. मोबाईल किंवा ई-मेलसाठी द्विस्तरीय प्रमाणीकरण (Two-Factor Authentication) सुरू करावे. संशयास्पद लिंक्स, ई-मेल किंवा अज्ञात फाईल्स उघडणे टाळावे. अँटीव्हायरस आणि फायरवॉल सारखे सुरक्षा सॉफ्टवेअर वापरून उपकरणे सुरक्षित ठेवावीत. सार्वजनिक Wi-Fi वापरताना संवेदनशील माहिती शेअर करू नये. सोशल मीडियावर अनोळखी लोकांना वैयक्तिक माहिती देऊ नये. बँकिंग व्यवहार करताना अधिकृत ॲप किंवा संकेतस्थळाचा वापर करावा. सतर्कता आणि सायबर शिस्त पाळल्यास हॅकिंग, फसवणूक आणि डेटा चोरीपासून सुरक्षितता मिळू शकते.





