फ्लिपकार्ट-अमेझॉनवर सेल येतोय, या गोष्टींची काळजी न घेतल्यास होऊ शकतो स्कॅम, अशी करा सुरक्षित शॉपिंग

Published:
फ्लिपकार्ट-अमेझॉनवर सेल येतोय, या गोष्टींची काळजी न घेतल्यास होऊ शकतो स्कॅम, अशी करा सुरक्षित शॉपिंग

फेस्टिव्हल सिझन येऊन ठेपला आहे आणि आता लोक जोरदार शॉपिंग करतील. आता बाजारातून सामान घेण्यासोबतच ऑनलाइन शॉपिंगही मोठ्या प्रमाणात केली जाते. फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर यावर्षी २३ सप्टेंबरपासून सेल सुरू होत आहे. यात लाखो लोक नवीन गॅझेट्स, फॅशन आणि ब्युटी प्रॉडक्ट्स इत्यादी खरेदी करतील.

साइबर गुन्हेगारांसाठीही हा मोठा संधीचा काळ आहे. ते या दरम्यान लोकांना वेगवेगळ्या स्कॅममध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना काही महत्त्वाच्या गोष्टींचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.

खोट्या वेबसाइट्सपासून सावध रहा

कधी कधी सायबर हॅकर्स लोकांना फसवण्यासाठी खरी वेबसाइटसारखी दिसणारी खोटी वेबसाइट तयार करतात. अशा वेबसाइटवरून खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. तुम्ही जशी तुमची माहिती त्यावर अपलोड करता, ती थेट हॅकर्सच्या ताब्यात जाऊ शकते. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक डिटेल्स चुकीच्या हातात पडण्याचा धोका असतो.

अपरिचितांकडून आलेले ईमेल उघडू नका

कंपनी आपल्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी ईमेल मार्केटिंगचा वापर करतात. फसवणूक करणारे लोकही याच पद्धतीचा वापर करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात. ते मोहक ईमेल पाठवतात. कोणीही लालचाने त्या ईमेलमधील लिंकवर क्लिक केल्यास त्यांची संवेदनशील माहिती हॅकर्सकडे जाऊ शकते, ज्याचा गैरवापर होण्याची भीती असते.

सार्वजनिक वाय-फाय वापरून खरेदी करू नका

ऑनलाइन खरेदी करताना कधीही सार्वजनिक वाय-फाय वापरू नका. खरं तर, सार्वजनिक वाय-फायवरील सुरक्षा कमी आहे आणि हॅकर्स याचा फायदा घेऊ शकतात. ते या असुरक्षित नेटवर्कचा वापर करून तुमचा क्रेडिट कार्ड नंबर आणि इतर माहिती चोरू शकतात.

प्रीपेड क्रेडिट कार्ड वापरा

ऑनलाइन खरेदी करताना प्रीपेड क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट करणे उचित आहे. याचे कारण म्हणजे प्रीपेड कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसतात. अशा परिस्थितीत, हॅकर्सना या कार्डमध्ये प्रवेश मिळाला तरी ते फक्त या कार्डमध्ये उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करू शकतील. बँकेत ठेवलेले तुमचे पैसे सुरक्षित राहतील.