पेमेंट करताना QR कोडची गरज नाही; ठेंगा दाखवा…पेमेंट करा, Thumbpay नेमका काय विषय?

Written by:Rohit Shinde
Published:
ThumbPay वापरण्यासाठी ग्राहकाने अंगठा डिव्हाइसवर ठेवावा लागतो, जो नंतर स्कॅन केला जातो. या माध्यमातून आता तुम्हाला पेमेंट करणे शक्य होणार आहे.
पेमेंट करताना QR कोडची गरज नाही; ठेंगा दाखवा…पेमेंट करा, Thumbpay नेमका काय विषय?

ऑनलाईन युपीआय पेमेंट्सचे प्रमाण गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढले आहे. पूर्वी बँकेत जाऊन पैसे जमा करणे किंवा एटीएममधून रक्कम काढणे हे त्रासदायक वाटायचे. पण आता मोबाईलमधील अॅप्सच्या साहाय्याने काही सेकंदांत पेमेंट करता येते. युपीआयमुळे व्यवहार केवळ जलदच नाहीत तर सुरक्षित आणि सोपेही झाले आहेत. अशा या परिस्थितीत आलेली Thumbpay पेमेंट सुविधा तुम्हाला आणखी फायदेशीर आणि वेळेची बचत करणारी ठरू शकते.

Thumbpay सुविधा कशी फायदेशीर?

भारतामध्ये अनेक लोक स्मार्टफोन वापरून QR कोड स्कॅन करून UPI पेमेंट करताना दिसतात, पण ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांच्यासाठी Proxgy स्टार्टअपने ThumbPay नावाचं नवीन प्रोडक्ट आणलं आहे. हे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनच्या मदतीने पेमेंट करण्याची सुविधा देते. याचा अर्थ, तुम्ही फक्त तुमचा अंगठा वापरून दुकानं, पेट्रोल पंप किंवा शोरूममध्ये पेमेंट करू शकता. ही प्रणाली Aadhaar authentication द्वारे UPI शी कनेक्ट होते. फोन, कार्ड किंवा वॉलेटची गरज नाही. पेमेंटसाठी ग्राहकाला फक्त डिव्हाइसवर अंगठा ठेवावा लागतो.

दुकानदार, शेतकरी, विद्यार्थी अशा सर्व स्तरातील लोक या सुविधेचा लाभ घेत आहेत. डिजिटल व्यवहारामुळे रोख पैशाची गरज कमी होत आहे आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाला या माध्यमातून बळ मिळाले आहे. शिवाय तुमच्याकडे स्मार्ट फोन जरी नसेल तरी तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.

Thumbpay ने पेमेंट कसं करायचं?

ThumbPay वापरण्यासाठी ग्राहकाने अंगठा डिव्हाइसवर ठेवावा लागतो, जो नंतर स्कॅन केला जातो. AEPS (Aadhaar Enabled Payment System) अंगठ्याच्या मदतीने व्यक्तीची ओळख पडताळते. ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यावर UPI प्रणाली बँक-टू-बँक पेमेंट पूर्ण करते. QR कोड, स्मार्टफोन किंवा रोख रकमेची गरज नाही.

डिव्हाइस QR कोड आणि NFC पेमेंटला सपोर्ट करते. UPI साउंडबॉक्स आणि 4G ला सपोर्ट असून वायफाय कनेक्टिव्हिटी देखील आहे. ThumbPay ची किंमत ₹2,000 आहे. हे बॅटरीवर चालते, ज्यामुळे मोठ्या शोरूम, लहान दुकानं आणि ग्रामीण भागात वापरण्यास योग्य आहे. त्यामुळे आगामी काळात ग्रामीण तसेच शहरी भागातील स्मार्ट फोन वापरणाऱ्या तसेच न वापरणाऱ्या नागरिकांना देखील या सुविधेचा लाभ घेत येणार आहे. त्यामुळे हा डिजिटल पेमेंट प्रणालीतील आणखी एक महत्वाचा बदल म्हणावा लागेल.