पीएफचा पैसा नोकरदारांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने PF काढण्याची प्रक्रिया आता सोपी केली आहे. आधार, पॅन आणि बँक तपशील अपडेट केले तर अतिरिक्त कागदपत्रांशिवाय पैसे काढता येतात. पण, EPFO ने पीएफचे पैसे काढण्यासाठी आधार ओटीपी आणि फेस व्हेरिफिकेशन अनिवार्य केले आहे. त्यामुळे नेमकी ही नवी प्रक्रिया काय असणार आहे, ते समजून घेऊ…
कागदपत्रांशिवाय मिळणार पीएफचे पैसे
सरकारने PF खात्यातून पैसे काढायची ही प्रक्रिया खूप सोपी केली आहे. कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देत सरकारने पीएफ काढण्यासाठी भरपूर कागदपत्रे सादर करण्याचा त्रास आता संपवला असून आता तुम्ही कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय तुमचे पैसे सहजपणे काढू शकता. तुमचे PF खाते आधारशी जोडलेले असेल, पॅन आणि बँक तपशील अपडेट केले असतील आणि सर्व काही EPFO रेकॉर्डशी जुळत असेल तर तुम्हाला काही मिनिटांत तुमचे पैसे तुमच्या बँक अकाऊंटमध्ये हस्तांतरित होतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने या संदर्भात माहिती दिली आहे.
आधार OTP आणि फेस व्हेरिफिकेशन आता अनिवार्य करण्यात आले आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीमुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये.आज, 90% पेक्षा जास्त पीएफ दावे ऑनलाइन केले जात आहेत आणि त्यापैकी बरेच दावे फक्त तीन दिवसांत ऑटो-सेटलमेंटद्वारे निकाली काढले जातात.
पीएफ काढण्याची प्रक्रिया नेमकी काय?
कमीत कमी कागदपत्रांसह आता PF विड्रॉल शक्य झालं आहे. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून EPFO पोर्टल किंवा उमंग ॲपवर लॉग इन करा, आधार, पॅन आणि बँक तपशील जोडलेले आणि पडताळलेले असल्याची खात्री करा. ‘Online Services’वर जा आणि ‘दावा (फॉर्म-31, 19, 10C)’ निवडा, पैसे काढण्याचे कारण (उदा. लग्न, वैद्यकीय, घर खरेदी) आणि रक्कम प्रविष्ट करा. आधार OTP किंवा फेस व्हेरिफिकेशनसह फॉर्म सबमिट करा. कागदपत्रांशिवाय, तपशील अपडेट केले असल्यास, ऑटो-सेटलमेंटद्वारे तीन दिवसांत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.
अशा परिस्थितीत, तुमच्या EPFO खात्याचे तपशील आत्ताच तपासा आणि अपडेट करा जेणेकरून तुम्हाला गरजेच्या वेळी कोणत्याही अडचणीशिवाय त्वरित पैसे मिळू शकतील. त्यामुळे आता कर्मचारी वर्गाला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे तुम्हाला देखील अडचणीच्या काळात या निर्णयाचा फायदा होऊ शकतो.






