महिन्याला पगार झाला की लगेच संपतो, काय कराल? 50-30-20 चा फॉर्म्युला वापरणार का?

Written by:Smita Gangurde
Published:
उत्पन्न किती असतं, यावर बचत अवलंबून नसते. तर ती अवलंबून असते तुमच्या नियोजनावर. तुमचा पगार कितीही जास्त असला आणि खर्च कसा करायचा याचं काही नियोजन तुमच्याकडे नसेल, तुम्ही कुठेही पैसे खर्च करत असाल, तर तुमची बचत कधीही होऊ शकणार नाही.
महिन्याला पगार झाला की लगेच संपतो, काय कराल? 50-30-20 चा फॉर्म्युला वापरणार का?

मुंबई- नोकरदार वर्गासाठी सगळ्यात महत्त्वाचा आठवडा असतो तो महिन्याचा पहिला आठवडा. या आठवड्यात पगार खात्यात जमा होतो, अनेक स्वप्न, अनेक अपुऱ्या बाबी करायच्या असतात. पण पुढच्या आठवड्याच्या आत पगार संपलेला पाहायला मिळतो.

गृह कर्जाचे, वैयक्तिक कर्जाचे हप्ते, किराणा, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, लाईट बिल, बिल्डिंगचा मेन्टेनन्स, मासिक पास यावर पगार कसा खर्च होतो, ते समजतही नाही. अशा स्थितीत बचत करावी तरी कशी, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो.

शेअर बाजार, म्युचअल फंड्स, सोनं, चांदी यात गुंवणूक करण्यासाठी पैसेच महिनाकाठी उरत नाहीत, असा अनुभव अनेकांचा आहे. अनेकांची अशी धारणा आहे की उत्पन्न वाढलं की बचत होईल. अशा स्थितीत बचत करायची असेल तर कशी, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न

उत्पन्न नव्हे नियोजन ही समस्या

या विषयाबाबत काही आर्थिक तज्ज्ञांचं मत असं आहे की उत्पन्न किती असतं, यावर बचत अवलंबून नसते. तर ती अवलंबून असते तुमच्या नियोजनावर. तुमचा पगार कितीही जास्त असला आणि खर्च कसा करायचा याचं काही नियोजन तुमच्याकडे नसेल, तुम्ही कुठेही पैसे खर्च करत असाल, तर तुमची बचत कधीही होऊ शकणार नाही. त्यामुळेच आलेल्या उत्पन्नातून 50-30-20 असा फॉर्म्युला वापरुन तुम्ही नक्कीच बचत करु शकाल.

काय आहे 50-30-20 फॉर्म्युला?

याचा साधा अर्थ असा आहे की तुम्हाला मिळत असलेल्या उत्पन्नाचे तीन भाग करा, त्यातील महत्त्वाचा भाग आहे तो 50 टक्क्यांचा

50 टक्क्यांचं नियोजन – उत्पन्नातील 50 टक्क्यांतून घराचं भाडं किंवा गृहकर्ज, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, किराणा, दूध, भाज्या, लाईट बिल, पाणी किंवा मेन्टेनन्स, ऑफिसमध्ये जाण्या येण्याचा खर्च, या व्यतिरिक्त असलेल्या कर्जांचे हप्ते, विमा यासाठी पैसे आधीच बाजूला काढून ठेवा.

30 टक्के तुमच्यासाठी – या पैशांतून तुम्ही तुमचं जगणं एन्जॉय करा. यात हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाणं, ऑनलाईन शॉपिंग, ओटीटी, महाग गॅझेट्स, बाहेर फिरणे अशा बाबी करा.

20 टक्के बचत- उरलेली 20 टक्के रक्कम मात्र न चुकता बचतीसाठी वापरा. यात एसआयपी, आरडी, पीपीएफ, आपतकालीन खर्च यासाठी ही रक्कम आवर्जून बाजूला काढून ठेवा.

एकाच वर्षी नाही तर प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पगाराचा याच फॉर्म्युलाने वापर करुन पाहा. यामुळे पगार झाल्याबरोबर याचं नियोजन कसं करायचं आहे याची पूर्ण कल्पना तुम्हाला आलेली असेल. यातून नेमका खर्च कुठे होतो, त्यातील आवश्यक किती आणि अनावश्यक किती याचा अंदाज तुम्हाला येईल. जर तुम्ही जास्त पैसे वाचवू शकाल तर ते पैसे तुम्ही बचतीसाठी काढून ठेवा.

कमी पगारातही बचत शक्य

कमी पगार असेल तर बचत करता येत नाही हा भ्रम आहे. जास्त पगार आला की बचत करु असं मनात धरुन बसाल तर तो दिवस कधीही येणार नाही. त्यामुळे आधी छोट्या रकमेपासून सुरुवात करता येईल.थेंब थेंबे तळे साचे अशी आपल्याकडे एक म्हण आहे.त्यानुसार सुरुवातील महिन्याला 500-1000 रुपयांची बचत करणं शक्य आहे का, हे तपासा त्यानुसार तुम्ही बचत करु लागलात आणि तुमच्या अंगवळणी पडलं की आपोाप दरमहिन्याला चांगली बचत करता येऊ शकेल.

अगदीच 20 टक्के वाचवण्याची गरज नाही. सुरुवातीला हा आकडा लहान स्वरुपाचाही असू शकेल. मा6 यातून बचत गरजेची आहे, हे आपल्या ध्यानात येईल.