मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पूर्व–पश्चिम कनेक्टिव्हिटी अधिक गतीमान करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या गोरेगाव–मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाने आता महत्वाचा टप्पा गाठला आहे. नाहूर ते ऐरोली जोडणाऱ्या उड्डाणपुलासाठी मुंबई महानगरपालिकेने 1,293 कोटी रुपयांची निविदा जाहीर केली असून, हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास मोठ्या प्रमाणात सुलभ होणार आहे.
काय फायदा होतोय (Mulund Goregaon Link Road)
नाहूर ते ऐरोली असा 1.33 किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील कोंडी कमी करण्यासाठी प्रभावी ठरणार आहे. या उड्डाणपुलामुळे नाहूर, ऐरोली, ठाणे आणि दक्षिण मुंबई या महत्त्वाच्या भागांना सिग्नल-मुक्त सुविधा मिळणार आहे. एका फ्लायओव्हरवरून चार दिशांकडे थेट मार्ग उपलब्ध होणे हे या प्रकल्पाचे मोठे वैशिष्ट्य मानले जात आहे.
हे ही वाचा
या उड्डाणपुलावर केबल-स्टेड प्रकारचा पूल उभारण्यात येणार आहे, ज्यामुळे वाहतुकीची क्षमता वाढणार असून संरचनाही अधिक सुरक्षित आणि सक्षम होणार आहे. बांधकाम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली हा मुख्य उड्डाणपूल समाविष्ट असेल. दुसऱ्या टप्प्यात चार वेगवेगळ्या दिशांना जोडणारे इंटरचेंज तयार केले जातील. यात ठाणे–नाहूर, ऐरोली–ठाणे, मुंबई–ऐरोली आणि दक्षिण मुंबई–ऐरोली अशा चार महत्वाच्या जोडण्यांचा समावेश असेल. Mulund Goregaon Link Road
प्रवासाचा वेळ वाचणार
गोरेगाव–मुलुंड लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर 75 मिनिटांचा प्रवास अवघ्या 25 मिनिटांत करता येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 12.2 किलोमीटर लांबीचा हा मार्ग गोरेगावमधील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मुलुंडमधील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे यांना थेट जोडणार आहे. त्यामुळे मुंबईत पूर्व ते पश्चिम प्रवासाची गती आणि प्रवासाचा दर्जा दोन्ही वाढणार आहेत.
एकूण 14,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात दिंडोशी कोर्टाजवळील 1.2 किलोमीटर उड्डाणपूल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील जुळ्या बोगद्यांपर्यंतचा विस्तार, गोरेगाव पूर्व आणि मुलुंड पश्चिम येथे रस्त्यांचे रुंदीकरण आणि नवीन इंटरचेंज, तसेच मुलुंडजवळ मोठा क्लोव्हरलीफ इंटरचेंज यांचा समावेश आहे.
प्रकल्पाचे काम चार टप्प्यांत विभागले गेले आहे. पहिल्या टप्प्यात दिंडोशी कोर्टाजवळील उड्डाणपूल, दुसऱ्या टप्प्यात रस्ते रुंदीकरण आणि इंटरचेंज, तिसऱ्या टप्प्यात फिल्म सिटी परिसरातील ट्विन बोगदे आणि चौथ्या टप्प्यात मुलुंड येथील क्लोव्हरलीफ इंटरचेंज बांधकाम असे नियोजन आहे.
हा महत्वाकांक्षी प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, त्यानंतर मुंबईतील वाहतुकीचे चित्र मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. पूर्व–पश्चिम कनेक्टिव्हिटी मजबूत होणार असून, नागरिकांचा प्रवासाचा वेळ आणि इंधन दोन्ही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.