Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करताना भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या मोठ्या योजनांची घोषणा केली. देशातील दळणवळण वेगवान, आधुनिक आणि जागतिक मानकांनुसार उभारण्यासाठी सरकारने सात नवीन हाय-स्पीड रेल कॉरिडॉर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पांमुळे देशातील प्रवास वेळेत मोठी घट होईल, तसेच प्रमुख शहरांमधील संपर्क अधिक मजबूत होणार आहे.
या नव्या नेटवर्कमुळे मुंबई, पुणे, दिल्ली, वाराणसी, बंगळुरू, चेन्नई यांसारख्या महानगरांमधील प्रवास तासाभराच्या आत पूर्ण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मुंबई–पुणे मार्गावरील प्रस्तावित हाय-स्पीड रेल्वेमुळे महाराष्ट्रातील दोन प्रमुख आर्थिक शहरांमधील अंतर काही मिनिटांवर येणार आहे. प्रवासाची गती वाढल्यास औद्योगिक गुंतवणूक, व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोणकोणत्या मार्गावर नवीन रेल्वे धावणार Budget 2026
सरकारने ज्या सात मार्गांवर हाय-स्पीड रेल्वे विकसित करण्याची घोषणा केली आहे, त्यात मुंबई–पुणे, दिल्ली–वाराणसी, हैदराबाद–बंगळुरू, बंगळुरू–चेन्नई, दिल्ली–अहमदाबाद, मुंबई–नागपूर आणि हावडा–वाराणसी या मार्गांचा समावेश आहे. या मार्गांवर २५० ते ३२० किमी प्रति तास वेगाने गाड्या धावतील. या गाड्यांमुळे व्यवसायिक केंद्रे, बंदरे, आयटी हब आणि औद्योगिक क्षेत्रांमधील दळणवळण अधिक वेगवान व अखंड होणार आहे.
मुंबई पुण्याला लॉटरी
महाराष्ट्रासाठी या प्रकल्पाचे महत्त्व मोठे मानले जात आहे. मुंबई–पुणे मार्गामुळे आयटी क्षेत्र, स्टार्टअप इकोसिस्टीम आणि एमएसएमई उद्योगांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तर मुंबई–नागपूर मार्ग विदर्भातील उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग आणि पर्यटनाला नवी संजीवनी देईल. हाय-स्पीड रेल्वेच्या बांधकामामुळे हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे. तसेच लॉजिस्टिक्सचा खर्च कमी झाल्याने उद्योग उत्पादन स्वस्त व स्पर्धात्मक होईल. Budget 2026
बजेटमध्ये रेल्वे सुरक्षेलाही मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. भारतीय तंत्रज्ञानावर आधारित ‘कवच’ अँटी-कोलिजन सिस्टीमचा विस्तार आता ४४,००० किमी रेल्वेमार्गांवर करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे धडक अपघातांवर अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होईल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढेल.
याशिवाय, देशातील दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठीही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. २०२६ च्या अखेरीस २४ कोच असलेल्या वंदे भारत स्लीपर गाड्या सुरु करण्याचा सरकारचा मानस आहे. या आधुनिक, वेगवान आणि आरामदायी स्लीपर ट्रेन प्रामुख्याने राजधानी एक्सप्रेसला पर्याय ठरणार असून, रात्रीच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुखद आणि जलद होणार आहे.
या सर्व प्रकल्पांमुळे देशातील रेल्वे नेटवर्क अधिक सुरक्षित, जलद आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत होईल. आर्थिक विकास, पर्यटनवाढ, गुंतवणूक आकर्षण आणि रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांवर याचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राचा विकास वेगवान करण्यासाठी या हाय-स्पीड कॉरिडॉरचा मोठा वाटा असणार आहे.





