Mumbai Local Train : वीकेंडला मुंबईकर कोंडीत ! 240लोकल गाड्या रद्द करण्याचा निर्णय

Published:
ब्लॉकच्या काळात संपूर्ण लोकलसेवेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. अनेक गाड्या उशिराने धावत असून काही गाड्या मार्गातच थांबण्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेषत: सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी अनेक लोकल रद्द झाल्याने प्रवाशांची स्टेशनवर मोठी कोंडी होते आहे
Mumbai Local Train : वीकेंडला मुंबईकर कोंडीत ! 240लोकल गाड्या रद्द करण्याचा निर्णय

Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेवरील मोठ्या देखभालकामामुळे या शनिवार आणि रविवारी प्रवाशांच्या हालचालींवर मोठा परिणाम होणार आहे. कांदिवली आणि बोरिवली दरम्यान सुरू असलेल्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी रेल्वेने रात्रकालीन ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे दोन्ही दिवसांत एकूण 240 लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात मोठा अडथळा निर्माण होणार आहे.

कधी असेल मेगा ब्लॉक (Mumbai Local Train)

शुक्रवारी आणि शनिवारी रात्री 11.15 पासून पहाटेपर्यंत अप जलद मार्गावर ब्लॉक असेल. त्याचप्रमाणे मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 या वेळेत डाऊन जलद मार्गावर कामे चालणार आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी प्रत्येकी 120 लोकल फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यात अप दिशेच्या 60 आणि डाऊन दिशेच्या 60 अशा एकूण 120 फेऱ्या प्रत्येकी दिवशी रद्द होतील.

दरम्यान, ब्लॉकच्या काळात संपूर्ण लोकलसेवेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. अनेक गाड्या उशिराने धावत असून काही गाड्या मार्गातच थांबण्याच्या घटना वाढल्या आहेत. विशेषत: सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी अनेक लोकल रद्द झाल्याने प्रवाशांची स्टेशनवर मोठी कोंडी होते आहे. प्लॅटफॉर्मवरून गाड्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची धावपळ पाहायला मिळत आहे.

AC लोकल ट्रेन वाढल्या

रेल्वेने एसी लोकलच्या गाड्या वाढवल्या असून साध्या लोकलच्या फेऱ्या तुलनेने कमी होत आहेत. दररोज लोकलने प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना याचा थेट तोटा होणार आहे. वाढलेल्या गर्दीमुळे प्रवासाचा वेळही वाढत असल्याची तक्रार मुंबईकर करत आहेत.

बांधकाम सुरू असलेल्या सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण होईपर्यंत अधूनमधून असे ब्लॉक घेतले जाण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी पर्यायी प्रवासाची तयारी ठेवण्याचा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिला आहे. परंतु सलग दोन दिवसांच्या मोठ्या ब्लॉकमुळे आणि 240 फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांच्या वीकेंडच्या प्रवासात मोठी अडचण निर्माण झालेली आहे.