Fri, Dec 26, 2025

Thane Municipal Corporation Election : ठाणे महापालिका निवडणूकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

Published:
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसाठी आवश्यक असलेले नामनिर्देशनपत्र व शपथपत्रांचे अद्ययावत नमुने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत
Thane Municipal Corporation Election : ठाणे महापालिका निवडणूकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

Thane Municipal Corporation Election : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र देण्याचा देणे व स्विकारण्याची प्रक्रिया उद्या मंगळवार दिनांक 23  डिसेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया  (गुरुवार 25  डिसेंबर व  रविवार 28  डिसेंबर सार्वजनिक सुट्टी वगळून) 30 डिसेंबरपर्यत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत सुरू राहणार आहे.

नमुने उपलब्ध करून देणार

ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसाठी आवश्यक असलेले नामनिर्देशनपत्र व शपथपत्रांचे अद्ययावत नमुने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उमेदवारांनी हे नमुने प्राप्त करून नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरून ते सक्षम प्राधिकाऱ्यासमोर दृढकथन  करून विहित वेळेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ही माहितीपुस्तिका रु. 100/- इतक्या दराने प्रभागसमितीनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या ‍निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे उपलब्ध करण्यात आली आहे.

माहितीपुस्तिका तयार (Thane Municipal Corporation Election)

यासाठी ठाणे महानगरपालिकेमार्फत नामनिर्देशनपत्र व शपथपत्रांचे नमुने, त्यासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी तसेच इतर आवश्यक नमुने – उदा. उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज, निवडणूक प्रतिनिधी व मतदान प्रतिनिधी नियुक्तीचे नमुने, मतपत्रिकेवर नाव छापण्याचा नमुना, पक्षाच्या उमेदवाराने सादर करावयाचे जोडपत्र-१ व जोडपत्र-२ इत्यादींचा समावेश असलेली माहितीपुस्तिका तयार करण्यात आली आहे.

या माहितीपुस्तिकेमध्ये निवडणूक खर्चाची मर्यादा, निवडणूक खर्च सादर करण्याचे नमुने, आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, जाहिरात प्रमाणन आदेश यांसारख्या महत्त्वाच्या आदेशांच्या प्रती अथवा त्यांचे संदर्भ देण्यात येणार आहेत. तसेच प्रभागांचा एकत्रित नकाशा, प्रभागनिहाय आरक्षण, अनामत रक्कम, अहर्ता व अनहर्ता तरतुदी, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाचा पत्ता, त्यांना नेमून दिलेले प्रभाग तसेच मदत कक्षाचा संपर्क क्रमांक यासंबंधी माहितीही या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आली आहे. आयोगाच्या दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार नामनिर्देशनपत्र व शपथपत्रांचे अद्ययावत नमुने यामध्ये देण्यात आले आहेत.