Fri, Dec 26, 2025

टी-20 वर्ल्डकप २०२६ : हे चार संघ टी-२० उपांत्य फेरीत जातील, दिग्गज खेळाडूची भविष्यवणी

Published:
सूर्यकुमार यादवचा टी-२० मध्ये कर्णधारपदाचा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. भारताने त्याच्या नेतृत्वाखाली ३८ सामने खेळले आहेत, त्यापैकी २८ जिंकले आहेत.
टी-20 वर्ल्डकप २०२६ : हे चार संघ टी-२० उपांत्य फेरीत जातील, दिग्गज खेळाडूची भविष्यवणी

आगामी टी-२० विश्वचषकासाठी संघ हळूहळू जाहीर होत आहेत. आतापर्यंत भारताने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे, तर श्रीलंकेने आपला प्राथमिक संघ जाहीर केला आहे, ज्यामध्ये अजूनही बदल होऊ शकतात. पुढील वर्षी ७ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान हा विश्वचषक खेळवला जाईल.
दरम्यान, इंग्लंडचा दिग्गज फिरकी गोलंदाज मोंटी पनेसरने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम चारमध्ये पोहोचणाऱ्या संघांचे भाकित केले आहे. त्यांनी भारताच्या पुढील टी-२० कर्णधाराबाबत एक महत्त्वाचा खुलासाही केला आहे.

उपांत्य फेरीतील संघांबद्दल पनेसरची भविष्यवाणी

मॉन्टी पनेसरने एका माध्यम मुलाखतीत भाकीत केले होते की, “यावेळी भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड उपांत्य फेरीत पोहोचतील. मोठ्या संघांना हरवण्याची इंग्लंडची क्षमता ही एक ताकद आहे. मला वाटत नाही की न्यूझीलंड सध्या एक मजबूत संघ आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारत खूप मजबूत आहेत आणि ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड देखील चांगले संघ आहेत.”
पनेसर यांनी आणखी एक आश्चर्यकारक भाकित केले, ते म्हणाले की भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव मालिकावीराचा पुरस्कार जिंकेल. सूर्यकुमार यादव या वर्षी खराब फॉर्ममुळे संघर्ष करत आहे. गेल्या १९ टी-२० डावांमध्ये त्याने १३.६२ च्या खराब सरासरीने फक्त २१८ धावा केल्या आहेत.

भारताचा पुढचा टी-20 कर्णधार कोण असेल?

सूर्यकुमार यादवचा टी-२० मध्ये कर्णधारपदाचा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. भारताने त्याच्या नेतृत्वाखाली ३८ सामने खेळले आहेत, त्यापैकी २८ जिंकले आहेत आणि फक्त ६ मध्ये पराभव पत्करावा लागला आहे. दोन सामने बरोबरीत सुटले आणि दोन अनिर्णित राहिले.

पनेसर म्हणाले की, जर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारत टी-२० विश्वचषक जिंकू शकला नाही तर अक्षर पटेल नवा कर्णधार होऊ शकतो. पनेसर यांच्या मते, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अष्टपैलू खेळाडूंना प्राधान्य देतात, म्हणून त्यांनी अक्षर पटेल, जो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही चांगली करू शकतो, त्याला कर्णधार म्हणून नियुक्त केले जाईल असे भाकीत केले आहे.