प्रदोष व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते. प्रत्येक महिन्यात कृष्ण आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत केले जाते. या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. चला जाणून घेऊया वर्षातील शेवटच्या प्रदोष व्रताच्या पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे आणि पूजा पद्धत जाणून घेऊयात…
प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त
प्रदोष व्रत बुधवारी आहे, म्हणून त्याला बुध प्रदोष असे म्हंटले जाईल. प्रदोष काल बुधवार, 17 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिट ते रात्री 8 वाजून 11 मिनिटांपर्यंत असेल. भगवान शिवाच्या पूजेसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो.
बुध प्रदोष व्रताचे महत्त्व
बुध प्रदोष व्रत हे भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित असून, बुधवारी येणाऱ्या प्रदोष काळात हे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, कुटुंबात सुख-समृद्धी येते, संततीप्राप्ती होते आणि आरोग्य लाभते. भगवान शिवाची कृपा मिळते, ज्यामुळे सुख-शांती आणि आनंद प्राप्त होतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो.
पूजेची पद्धत
- सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. घरामध्ये गंगाजल शिंपडावे.
- एका पाटावर किंवा चौरंगावर शिव-पार्वतीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे.
- घरातील देव्हाऱ्यात किंवा शिवमंदिरात शिवलिंगावर पाणी, दूध, दही, मध यांनी अभिषेक करावा.
- बेलाची पाने, गंध, फुले, अक्षता, नैवेद्य अर्पण करावा. नंदीलाही अभिषेक करावा.
- ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा.
- सूर्यास्ताच्या वेळी (प्रदोष काळात) पुन्हा पूजा करावी.
- बुध प्रदोष व्रताची कथा वाचावी आणि आरती करावी.
- पाणी न पिता उपवास करावा आणि नंतर पारण करावे, असे शास्त्र सांगते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





