MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

राज्य सरकारचा गुटखा उत्पादकांना दणका; थेट मकोका अंतर्गत होणार कारवाई

Written by:Rohit Shinde
Published:
 राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवर संपूर्ण बंदी असतानाही शाळा, महाविद्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे आणि अगदी ग्रामीण भागांमध्येही मोठ्या प्रमाणावर गुटखा खुलेआम विकला जात असल्याचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे.
राज्य सरकारचा गुटखा उत्पादकांना दणका; थेट मकोका अंतर्गत होणार कारवाई

महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री कायद्याने पूर्णतः बंदी असतानाही अवैधरित्या हा व्यवसाय सुरू आहे. राज्याबाहेरून गुटखा आणून तो लपवून पानटपऱ्या, दुकाने किंवा गुप्त मार्गाने विकला जातो. या अवैध धंद्यामागे संघटित टोळ्या सक्रिय असून तरुण पिढी याची मोठी शिकार ठरत आहे. गुटख्याच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, हृदयरोग आणि इतर गंभीर आजार वाढत आहेत. प्रशासन, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जात असली तरी अधिक कडक अंमलबजावणी, जनजागृती आणि कठोर शिक्षा आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे.

गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांना दणका

राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवर संपूर्ण बंदी असतानाही शाळा, महाविद्यालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे आणि अगदी ग्रामीण भागांमध्येही मोठ्या प्रमाणावर गुटखा खुलेआम विकला जात असल्याचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर गुटखा बंदी कायद्याची प्रभावी आणि कडक अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला असून, येत्या नवीन वर्षापासून गुटखा उत्पादक, वाहतूकदार आणि मोठ्या विक्रेत्यांवर थेट मकोका लागू करण्याची तयारी सुरू केली आहे.

अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवळ यांनी याबाबतची अधिक माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केलं की, गुटखा बंदी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावी व्हावी, यासाठी आता संघटित गुन्हेगारीच्या चौकटीतून कारवाई करण्याचा शासनाचा निर्धार आहे. यापूर्वी गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, सध्याच्या मकोका कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेले “हार्म” आणि “हर्ट” हे दोन्ही घटक तांत्रिकदृष्ट्या पुरेसे ठरत नसल्याने हा प्रस्ताव अडचणीत आला होता. त्यामुळे गुटखा विक्रीसारख्या गंभीर सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गुन्ह्यांवर मकोका लागू करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली होती.

गुटखा, तंबाखू शरीराला हानिकारक

गुटखा आणि तंबाखूचे सेवन शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहे. गुटख्यातील निकोटीन, चुना व रसायने तोंड, दात आणि हिरड्यांचे गंभीर नुकसान करतात. नियमित सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, फुफ्फुसांचे आजार तसेच हृदयरोगाचा धोका वाढतो. तंबाखूचे व्यसन एकदा लागल्यानंतर ते सोडणे कठीण होते आणि मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. विशेषतः तरुण आणि किशोरवयीन मुलांमध्ये याचे दुष्परिणाम लवकर दिसून येतात. त्यामुळे निरोगी जीवनासाठी गुटखा व तंबाखूपासून दूर राहणे आणि जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे.