जळगावातील ओसाड गावातून काढले तब्बल 5 हजार जन्मदाखले, प्रशासन गाफील; गावकऱ्यांकडून चौकशीची मागणी

Written by:Smita Gangurde
Published:
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील रताळे ग्रामपंचायतीच्या नावे तब्बल 4 हजार 907 जन्मदाखले काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
जळगावातील ओसाड गावातून काढले तब्बल 5 हजार जन्मदाखले, प्रशासन गाफील; गावकऱ्यांकडून चौकशीची मागणी

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील रताळे ग्रामपंचायतीच्या नावे तब्बल 4 हजार 907 जन्मदाखले काढल्याचा प्रकार समोर आला आहे. हे जन्म दाखले काढण्याच्या सीआरएस प्रणालीत अस्तित्वात नसलेल्या भाटपुरी या गावाचा लॉगिन आयडी वापरण्यात आलाय. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडालीय. विशेष म्हणजे बिहारच्या एका तरुणानं हा सगळा प्रकार केल्याचं समोर आलंय.

बनावट जन्मदाखल्याचा प्रकार कसा झाला उघड?

जळगाव जिल्ह्यात जंगलात असलेल्या याच ओसाड गावातून एक दोन नव्हे तर तब्बल 4 हजार 907 जन्मदाखले काढण्यात आले आहेत. जंगलातल्या या गावाचं नाव आहे भाटपुरी. या ठिकाणी आता गावाचे कोणतेही अवशेष नाहीत. केवळं दोन मंदिर उभी आहेत. बनावट जन्मदाखले देणाऱ्या या गावात धक्कादायक प्रकार सुरू होता. हा सगळा प्रकार उघड झालाय तो यवतमाळ बनावट जन्मदाखला प्रकरणात अटक झालेल्या एका आरोपीमुळे. या आरोपीनं जळगाव जिल्ह्यातील रताळे नावाचं गाव बनावट जन्म दाखले काढल्याची माहिती दिल्यानं हा प्रकार समोर आला. या घोटाळ्यातील आरोपीचं नाव आहे आदर्श कुमार दुबे आणि तो बिहारचा राहणारा आहे. ओसाड गावाच्या लॉगिन आयडीचा वापर करून हजारो बनावट दाखले काढले जात असताना जिल्हा प्रशासन मात्र गाफिल राहिल्याचं या प्रकारानं समोर आला आहे.

रताळे गावाची 1700 लोकसंख्या 4000 जन्म दाखले कसे निघाले, असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आरोपीनं दिलेल्या या माहितीनंतर जिल्हा प्रशासनाला जाग आलीय. त्यानंतर बनावट दाखले रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या आरोपी आदर्शकुमार दुबे हा जळगाव पोलिसांच्या ताब्यात असून त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलीय. अस्तित्वात नसलेल्तया गावाचे नाव सीआरएस प्रणालीत कसं आलं याचा शोध आता घेण्यात येतोय

नेमका काय घडला प्रकार?

1. रताळे गावाशेजारी जंगलात शेकडो वर्षांपूर्वी भाटपुरी गाव
2. सद्यस्थितीत जंगलात गावाचे कोणतेही अवशेष नाहीत
3. 2016 – 17 मध्ये जन्मदाखला नोंदीसाठीच्या सीआरएस पोर्टलमध्ये भाटपुरी गावाचा समावेश
4. गाव असल्याची पडताळणी न करता गावाच्या नावाने लॉगिन आयडी जनरेट
5. वापराविना पडून असलेल्या या लॉगिन आयडीच्या आधारे बनावट जन्म दाखले

या प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी किरीट सोमय्यांनीही रताळे गावात भेट दिली. बनावट जन्मदाखले प्रकरणांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचं मानण्यात येतंय. परदेशी नागरिकांनी या दाखल्यांचा वापर केला का? या दाखल्यांचा वापर करून घुसखोरी केली गेली का? यासारखे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.