बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. बदलापुरातील ज्या नामांकित शाळेत चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाला त्या शाळेचे सचिवही या प्रकरणात सहआरोपी आहेत.
सहआरोपी तुषार आपटेला भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद देण्यात आलं होतं. यानंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. अखेर वादानंतर तुषार आपटेने स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
तुषार आपटे याला भाजपानं आता स्वीकृत नगरसेवकपद दिल्यानं प्रकरण चर्चेत
दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट २०२४ मध्ये दोन बालिकांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात बदलापुरात आक्रोश व्यक्त झाला होता. बदलापूर पूर्वच्या आदर्श विद्या मंदिरात काम करणारा सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यानं हे कृत्य केल्यानंतर शाळेबाहेर पालक आणि नागरिकांच्या संतापाचा स्फोट झाला. आरोपीला तातडीनं फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात रास्ता रोकोही करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला अटक झाली, पुढे पोलीस चकमकीत तो मारलाही गेला. त्याचा जाणीवपूर्वक एन्काऊंटर करण्यात आल्याचाही आरोप झाला. मात्र याच प्रकरणातील सहआरोपी आणि शाळेचा सचिव तुषार आपटे याला भाजपानं आता स्वीकृत नगरसेवकपद दिल्यानं हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर बदलापूर नगरपरिषदेत भाजपानं घेतलेल्या या निर्णयानं बदलापुरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाजपानं लैंगिक अत्याचारातील आरोपीबाबत घेतलेल्या या निर्णयाचे पडसाद राजकारणातही उमटलेत. तुषार आपटेला लैंगिक अत्याचाराचं बक्षीस भाजपानं दिलं का, असा उपरोधिक सवाल संजय राऊत यांनी विचारलाय. भाजपनं हा निर्णय मागे घेतला नाही तर बदलापुरात महामोर्चा काढण्याचा इशारा मनसेनं दिला होता. भाजपासोबत सत्तेत असलेल्या शिंदे शिवसेनेनंही याबाबत नाराजी व्यक्त केली. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि किळसवाणं असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर हिंदुत्वाच्या विचारधारेवर चालणाऱ्या कालीचरण महाराजांनीही अशा अत्याचाऱ्याचं मुंडकं छाटायला हवं, असं वक्तव्य केलंय.
कोण आहे तुषार आपटे?
1. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी
२. लैंगिक अत्याचार घटनेवेळी शाळेच्या सचिवपदी
३. तुषार आपटेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
४. गुन्हा दाखल झाल्यानंतर तुषार आपटे 44 दिवस फरार
५. अटकेनंतर अवघ्या 48 तासांत जामिनावर सुटका
अक्षय शिंदे एन्काऊंटरचा मुद्दा या निमित्तानं पुन्हा चर्चेत आलाय. या प्रकरणी एसआयटी स्थापण्याचे मुंबई हायकोर्टाचा आदेश सुप्रीम कोर्टानंही ग्राह्य धरला होता. त्यानुसार एसआयटी चौकशी सुरु आहे. दुसरीकडे मानवाधिकार आयोगानं हे प्रकरण बंद केलंय. तर अक्षयच्या आई-वडिलांनी खटला पुढे चालू ठेवण्याची इच्छा नसल्याचं हायकोर्टात सांगितलं होतं. मात्र तरीही या प्रकरणी तपास सुरु ठेवण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. तुषार आपटेच्या निमित्तानं आता हे प्रकरणही पुन्हा चर्चेत आलंय. या सगळ्या वादानंतर तुषार आपटेनं स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. आता या प्रकरणाचा महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे.





