अवघ्या 22 मिनिटांच्या घरफोडीत चोरट्यांनी तब्बल अडीच कोटी रुपयांहून अधिकच्या मुद्देमालावर हात साफ केल्याची घटना नागपुरात घडली आहे. नागपूरच्या राजनगर परिसरातील बलजिंदर सिंग नय्यर यांच्या घरी ही धाडसी घरफोडी करण्यात आली. आता उपलब्ध सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहे. नागपूरच्या राजनगर या उच्चभ्रूंच्या वस्तीत बलजिंदर सिंग यांच्या याच बंगल्यातील आनंदाचं वातावरण काही काळात काळजीत रुपांतरीत झालं. नय्यर कुटुंबीयांच्या घरी सोमवारी 19 जानेवारीला लहान मुलाचा साखरपुडा असल्याने आनंदाचं वातावरण होतं. मुलाच्या साखरपुड्यासाठी नय्यर कुटुंबीय नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरला गेले असताना चोरट्यानं ही संधी साधली.
22 मिनिटांत कशी केली चोरी?
1. रात्री सव्वा आठनंतर चोर मागच्या बाजूने बंगल्यात शिरला
2. सीसीटीव्ही झाकून किचनचं ग्रील तोडून बंगल्यात प्रवेश केला.
३. बेडरूममध्ये प्रवेश करून कपाटाच्या किल्ल्या शोधून कपाट उघडलं
४. कपाटातून 247 तोळे सोन्याचं दागिने, हिऱ्याचे ब्रेसलेट, सोन्याची नाण्यांसह मौल्यवान वस्तू चोरल्या
५. दुसऱ्या बेडरूममधील 65 लाख रुपयांवरही डल्ला मारला.
चोराला बंगल्याची आधीच माहिती असल्याचा संशय…
पहाटे तीन वाजताच्या सुमारास नय्यर कुटुंबीय घरी पोहचल्यावर चोरीची घटना उघडकीस आली. बलजिंदर सिंग नय्यर हे व्यावसायिक असून ते 15 वर्षापासून राजनगरमध्ये राहत आहेत. आरोपीचं वय 30 ते 40 च्या दरम्यान असून त्यानं तोंडाला कापड बांधलं होतं. चोराला बंगल्याची आत आणि बाहेरची इत्यंभूत माहिती असल्याची शंका आहे. पोलीस आता या दृष्टीने तपास करतायेत. बंगल्यातील सीसीटीव्हीनुसार अज्ञात चोरट्यानं बंगल्यात रात्री 8.12 वाजता प्रवेश केला आणि 8.34 मिनिटांनी तो बाहेर पडला. बंगल्यातील सर्वच गोष्टींची इत्यंभूत माहिती असल्याशिवाय ही चोरी शक्य नसल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. चोरीच्या या घटनेत बंगल्यातील कुणाचा समावेश आहे का या दिशेनं पोलिसांचा तपास सुरू आहेना





