Marathi News
Sun, Jan 11, 2026

Mirzapur The Film : मिर्जापुर द फिल्म’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला,श्रिया पिळगांवकरने शेअर केला खास फोटो

Published:
मिर्जापूरच्या  दुनियेत पुन्हा एकदा प्रेक्षकांना घेऊन जाण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. ‘मिर्जापूर’ वेब सीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले होते.
Mirzapur The Film : मिर्जापुर द फिल्म’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला,श्रिया पिळगांवकरने शेअर केला खास फोटो

Mirzapur The Film : मिर्जापूरच्या  दुनियेत पुन्हा एकदा प्रेक्षकांना घेऊन जाण्यासाठी निर्माते सज्ज झाले आहेत. ‘मिर्जापूर’ वेब सीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले होते. गुन्हेगारी जग, सत्ताकांक्षा, सूड आणि रक्तपात या सर्वांचा अनुभव देणाऱ्या या मालिकेने भारतीय ओटीटी कंटेंटला नवा आयाम दिला. आता याच मालिकेवर आधारित एक नवीन चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे आणि त्याचे शीर्षक आहे ‘मिर्जापुर द फिल्म’.

या चित्रपटाबाबत मोठी माहिती अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. विशेष म्हणजे मिर्जापूरच्या पहिल्या सीझनमध्ये मृत म्हणून दाखवले गेलेल्या एका महत्त्वाच्या पात्राचे पुनरागमन या चित्रपटात होणार असल्याची शक्यता तिच्या पोस्टमुळे स्पष्ट झाली आहे. श्रियाने साकारलेली स्वीटी गुप्ता ही भूमिका सीझन वनमध्ये चाहत्यांना खूप भावली होती. मात्र तिच्या विवाहसोहळ्यातच मुन्ना भैय्याने केलेल्या गोळीबारात तिचा मृत्यू दाखवण्यात आला होता. आता स्वीटी पुन्हा कथानकात परत येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

श्रियाने शेअर केले 2 फोटो (Mirzapur The Film)

श्रिया पिळगांवकरने इन्स्टाग्रामवर दोन छायाचित्रे शेअर केली आहेत. पहिल्या छायाचित्रात चित्रपटाचे क्लॅपबोर्ड दिसत असून दुसऱ्या छायाचित्रात अली फजल, श्वेता त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल आणि इतर कलाकारांसह संपूर्ण टीमचा समूह फोटो आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, “आठ वर्षांनंतर… अंदाज लावा, कोण मृत्यूच्या दारातून परत आलंय? मिर्जापुर फिल्म. शूटिंग सुरू आहे. लवकरच भेटू.” या एका कॅप्शनमुळे चाहत्यांच्या उत्सुकतेला उधाण आले आहे. Mirzapur The Film

तिच्या पोस्टनंतर चाहत्यांनी कमेंट्समधून विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यात सर्वाधिक विचारला गेलेला प्रश्न म्हणजे विक्रांत मैसीही या चित्रपटात दिसणार का? कारण पहिल्या सीझनमध्ये विक्रांत मैसी याची बबलू ही भूमिका देखील मुन्ना भैय्याच्या गोळीबारात ठार झाली होती. त्यामुळे त्याचेही पुनरागमन होऊ शकते का, याविषयी चर्चा रंगू लागली आहे.

मिर्जापुरच्या पहिल्या सीझनमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, दिव्येंदु शर्मा, विक्रांत मैसी, श्रिया पिळगांवकर, रसिका दुग्गल, हर्षिता गौर आणि कुलभूषण खरबंदा यांच्यासह अनेक कलाकारांची मजबूत फळी होती. दुसऱ्या सीझनमध्ये विक्रांत आणि श्रिया वगळता बहुतेक सर्व कलाकार कायम ठेवण्यात आले. तसेच विजय वर्मा, ईशा तलवार, लिलिपुट, अंजुम शर्मा, प्रियांशू पैन्युली, अनंगशा बिस्वास आणि नेहा सरगम यांसारख्या नव्या कलाकारांनी मालिकेत प्रवेश केला होता.

सध्या श्रीया काय करते

श्रिया पिळगांवकर सध्या प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ या चित्रपटामध्येही काम करत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि सैफ अली खान तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा एकत्र झळकणार आहेत. ‘टशन’नंतर ही त्यांची पहिलीच जोडी जमणार असून त्यामुळे हा प्रकल्पही खूप चर्चेत आहे.

श्रियाच्या करिअरकडे पाहिल्यास तिने 2013 मध्ये मराठी चित्रपट ‘एकुलती एक’मधून अभिनयाची सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला राज्य पुरस्कार मिळाला होता. हिंदीमध्ये तिने ‘फॅन’ या चित्रपटातून पदार्पण केले आणि त्यानंतर ‘गिल्टी माइंड्स’, ‘द ब्रोकन न्यूज’, ‘ताजा खबर’, ‘इस्‍क-ए-नादान’ अशा मालिकांमधून व चित्रपटांतून तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

‘मिर्जापुर द फिल्म’ची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र शूटिंग सुरू असल्यामुळे हा प्रकल्प लवकरच प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता आहे. मिर्जापुरच्या जगात परतण्याची चाहत्यांची उत्सुकता पाहता, हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच चर्चेचा विषय ठरला आहे.