Shraddha Kapoor : बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा वेग घेत आहे. अभिनेता शक्ति कपूर यांच्या घरी लवकरच शहनाई वाजणार असल्याच्या अफवा काही दिवसांपासून गाजत होत्या. मात्र या वेळी खुद्द श्रद्धानेच सोशल मीडियावर आपल्या विवाहाची हिंट देत चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.
काय म्हणाली श्रद्धा
अलीकडेच श्रद्धाने इंस्टाग्रामवर आपल्या ज्वेलरी ब्रँडसाठी एक प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिने व्हॅलेंटाईन डेच्या आसपास सर्वाधिक ब्रेकअप का होतात, यावर मजेशीर अंदाज व्यक्त केला आणि चाहत्यांना ‘या सीझनमध्ये एकटे राहू नका’ अशी विनोदी विनंती करत गिफ्ट बॉक्स सुचवला. याच पोस्टखाली एका चाहत्याने तिला थेट प्रश्न केला “शादी कब करोगे श्रद्धा कपूर जी?” अभिनेत्रीनेही तितक्याच हलक्याफुलक्या अंदाजात उत्तर देत म्हटलं, “मैं करूंगी, मैं विवाह करूंगी.” या एका वाक्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आणि चाहत्यांनी तिच्या लग्नाच्या चर्चांना नवी चालना दिली.
श्रद्धा आणि राहुल मोदीचे नाते पुन्हा चर्चेत
श्रद्धा कपूर गेल्या काही काळापासून लेखक आणि दिग्दर्शक राहुल मोदी सोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. दोघांनी कधीच अधिकृतरित्या रिलेशनशिपची घोषणा केली नसली, तरी त्यांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. श्रद्धा अधूनमधून राहुलसोबतचे मजेदार क्षण सोशल मीडियावर शेअर करत असल्याने चाहत्यांना दोघांच्या रिलेशनबद्दल खात्री वाटते. त्यामुळेच अभिनेत्रीने लग्नाची हिंट दिल्यानंतर चाहते म्हणू लागले की, “श्रद्धा लवकरच मोदी परिवाराची सून होणार का?”
श्रद्धाचा करिअरही सध्या तेजीत आहे. नुकतेच ती ‘स्त्री २’ या ब्लॉकबस्टर हॉरर-कॉमेडीमध्ये राजकुमार रावसोबत दिसली. त्याचबरोबर तिने ‘झूटोपिया २’च्या हिंदी आवृत्तीत जूडी हॉप्सला आवाज दिला. चर्चेनुसार श्रद्धा ‘तुम्बाड’च्या प्रीक्वेल ‘पहाडपंगिरा’मध्ये, तसेच सुपरनॅचरल ड्रामा ‘नागिन’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय ‘स्त्री ३’, ‘भेड़िया २’ आणि मराठी लोककलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित ‘ईथा’ या बायोपिकमध्येही तिची उपस्थिती पाहायला मिळू शकते.
श्रद्धाने दिलेली लग्नाची हिंट जरी हलकी-फुलकी असली, तरी तिच्या चाहत्यांमध्ये मात्र मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आता ती प्रत्यक्षात सात फेरे केव्हा घेते, हे पाहण्यासाठी सर्वांचेच डोळे तिच्या पुढील घोषणेवर खिळले आहेत.





