गडचिरोली- राज्यात आणि देशात नक्षलवाद्यांचा खात्मा होत असताना, राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढं टाकलंय. माओवाद्यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातीस बिनगुंडा परिसरात पोलीस मदत केंद्र उभाण्यात आलंय. या केंद्रामुळे छत्तीसगड सीमेजवळ असलेला दुर्गम भाग मुख्य प्रवाहात येणार आहे.
बिनागुंडा गावात मदतकेंद्र
गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागात बिनागुंडा गावात उभारण्यात आलेलं हे पोलीस मदत केंद्र नक्षलवादी मोहिमेला मोठी चपराक मानण्यात येतंय. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या परिसरातून नक्षल्यांचा बिमोड करण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारांकडून संयुक्तरित्या होतायेत. नक्षली चळवळला अखेरची घरघर लागलेली असताना माओवाद्यांच्या बालेकिल्ला असलेल्या अतिदुर्गम बिनागुंडा गावात नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आलीय. या मदत केंद्रासाठी अवघ्या दहा दिवसांत पोलिसांनी रस्त्याची निर्मिती करत 24 तासांच मत केंद्र सुरु करुन दाखवलंय. एकेकाळी बिनागुंडा पर्यंत पोलिसांना जाणं अशक्य होतं, मात्र आता त्यांना चांगला रस्ताही मिळालाय.
नक्षलग्रस्त भागात 24 तासांत पोलीस मदत केंद्र
पोलीस मदत केंद्र इतक्या कमी वेळात कसं उभारलं याची चर्चा आता सुरुये.
1.1 हजार सी–60 कमांडोंचा सहभाग
2. 18 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवानांची साथ
3. 500 विशेष पोलीस अधिकारी
4. खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात नवीन पोलीस मदत केंद्र उभारण्यात आलंय.
उद्घाटनातून विकासाचा मार्ग
विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील यांच्यासह बड्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. बिनागुंडा परिसराचा विकास व्हावा आणि माओवाद्यांच्या हिंसक कारावायांना आळा बसावा या उद्देशानं केंद्राची स्थापना झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
यावेळी बिनागुंडा हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना साड्या, पुरुषांना धोतर, ब्लॅकेंट, स्वयंपाक भांड्याचा संच, बकेट, मच्छरदाणी, युवकांना टी-शर्ट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, बिस्किटं, तर मुलांना क्रिकेट संच, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी साहित्यांचं वाटप करण्यात आले. या पोलीस मदत केद्रांमुळे छत्तीसगड सीमेजवळ असलेला दुर्गम भाग मुख्य प्रवाहात येणार.
नक्षली भागात चांगली सुरुवात
येत्या काळात अशी 10 पोलीस मदत केंद्र स्थापित करण्यात येणार आहेत. लाहेरी पासून 17 किमी तर छत्तीसगडच्या सिमेपासून केवळ 08 किमी अंतरावर असलेल्या अति-दुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा आणि सर्वांगीण विकासाला हातभार लागून ते विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरता बिनागुंडाचं पोलीस मदत केंद्र मैलाचा दगड ठरेल.





