परीक्षा परिषदेकडून रविवारी २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्हा केंद्रांवर ‘टीईटी’ घेतली जाणार आहे. रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर दीड तास आधी हजर राहावे, असे आवाहन परीक्षा परिषदेकडून करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या पहिल्या पेपरला नऊ वाजता, तर दुपारी अडीच वाजता सुरू होणाऱ्या पेपर भाग दोनसाठी उमेदवारांनी दुपारी एक वाजेपर्यंत केंद्रावर उपस्थित राहावे. उशिरा येणाऱ्या उमेदवारांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही. परीक्षेनंतर पुढील ४५ दिवसात टीईटीचा निकाल जाहीर केला.

आधार पडताळणी अनिवार्य; डिजिलॉकर सुविधा

राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसह म्हणजेच टीईटी सर्वच परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडूनआधार पडताळणी, उमेदवारांच्या प्रमाणपत्रासाठी डिजिलॉकरची सुविधा दिली जाणार आहे. याशिवाय टीईटी वर्षातून दोन वेळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, टीईटी, टेट अशा सर्व परीक्षांमध्ये उमेदवारांच्या आधार कार्डची ‘यूआयडीएआय’ कडून पडताळणी केली जाणार आहे. तसेच वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याचा परीक्षा परिषदेचा प्रयत्न आहे. टीईटी प्रमाणपत्र गहाळ झाल्यानंतर उमेदवारांना अडचणी येतात. त्यामुळे डिजिलॉकरचा पर्याय उपलब्ध असल्यास उमेदवारांची समस्या दूर होणार असल्याने ही सुविधाही लवकरच दिली जाईल.

टीईटी परीक्षेत मराठी माध्यमाचे उमेदवार सर्वाधिक आहेत. मराठीसाठी तीन लाख २७ हजार १३५, इंग्लिशमधून २८ हजार ४३७, उर्दू २५ हजार ९३५, हिंदी ९२ हजार ४२०, बंगाली माध्यमातून १६८, कन्नड १४६८, तेलगू ३०, गुजराथी ७५ आणि सिंधी माध्यमातून केवळ एका उमेदवाराने नोंदणी केली आहे. तसेच राज्यातून ५२८३ दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेला नोंदणी केली आहे. तसेच ४११ दिव्यांग उमेदवारांना लेखनिक पुरविण्यात आला आहे. माजी सैनिक असलेले ४५ उमेदवार परीक्षा देणार आहेत. अशी  माहिती देखील समोर येत आहे.

परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी कडक नियम

शिक्षक पात्रता परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात समवेक्षक तैनात असणार आहेत. ते पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ एका जागी स्थिर राहिले तर एआय ( आर्टिफिशियल इंटेलिजेंस) आधारित हॉटलाइनद्वारे केंद्र संचालकांना सूचना मिळेल. विद्यार्थी संशयास्पद हालचाल करत असेल, जसे की वारंवार मागे-पुढे पाहणे तरीही हॉटलाइन सक्रिय होईल. तसेच केंद्र संचालकांच्या केबिनमध्ये तीनपेक्षा जास्त लोक उपस्थित असतील किंवा अचानक अनोळखी व्यक्ती तिथे आल्यास, एआय-कॅमेरा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अलर्ट पाठवेल. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत हा उच्चस्तरीय एआय-निगराणीचा वापर केला जाणार आहे.
कॉपीमुक्त, पारदर्शक परीक्षेसाठी यंदा प्रत्येक केंद्रावर ‘एआय’ हॉटलाइन, सीसीटीव्ही असणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता पहिला पेपर सुरू होणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी एक तास आधी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यांचा चेहरा (फेस रेकग्निशन) व अंगठा बायोमेट्रिकद्वारे पडताळणी केला जाणार आहे. परीक्षार्थींचा चेहरा किमान ५० टक्के जुळायला हवा, अन्यथा त्याला परीक्षेला बसता येणार नाही.
परीक्षार्थीस कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेऊन जाता येणार नाहीत. दरम्यान, या परीक्षेत केंद्र संचालक, पर्यवेक्षक, समवेक्षक यांच्यावरही ‘एआय’ कॅमेऱ्यांचे लक्ष असणार आहे. प्रत्येक केंद्रावरील संशयास्पद हालचालींचा अलर्ट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेसह संनियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना लगेचच मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील ५२ वर्षांपर्यंतच्या शिक्षकांसाठी ‘टीईटी’ बंधनकारक केली. त्यामुळे यंदा ‘टीईटी’साठी गतवर्षीच्या तुलनेत लाखभर अर्ज जास्त आले आहेत.