Amravati News : काँग्रेस, MIM आणि भाजप एकत्र; या राजकीय समीकरणांनी जनता हैराण!

Written by:Smita Gangurde
Published:
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेतील विविध समित्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यासाठी भाजप, एआयएमआयएम आणि काँग्रेस एकत्र आले आहेत.
Amravati News : काँग्रेस, MIM आणि भाजप एकत्र; या राजकीय समीकरणांनी जनता हैराण!

अकोल्यातील अकोटमध्ये नगरपालिकेत भाजप आणि एमआयएमच्या युतीच्या बातमीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या वृत्तानंतर विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं होतं. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही युती अमान्य केली होती. ही घटना ताजी असताना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपरिषदेतील विविध समित्यांच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड करण्यासाठी भाजप, एआयएमआयएम आणि काँग्रेस एकत्र आले आहेत.

अचलपूरमध्ये नेमकं काय घडलं?

अचलपूरमधील अलिकडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, ४१ सदस्यांच्या नगरपरिषदेमध्ये काँग्रेसने १५ जागा जिंकल्या आहेत. यामध्ये भाजपने नऊ, एआयएमआयएमने तीन, अपक्षांनी दहा, प्रहार जनशक्ती पक्षाने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (एनसीपी) दोन जागा जिंकल्या. यावेळी सभापतीपदासाठी भाजप आणि एमआयएम एकत्र आले आहेत. यावेळी आयएमआयएमचे नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.

MIMच्या या नगरसेवकाची शिक्षण आणि क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

एआयएमआयएमच्या या नगरसेवकाची शिक्षण आणि क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्याचप्रमाणे, काँग्रेसच्या एका सदस्याची पाणीपुरवठा समितीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर भाजपच्या एका नगरसेवकाची महिला आणि बाल कल्याण समितीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी माध्यमांना सांगितलं की, या समन्वयासाठी त्यांना विश्वासात घेण्यात आलं नव्हतं.

अकोट नगर परिषदेतही एआयएमआयएम-भाजप युती झाली होती…

राज्यातील अलिकडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर, भाजपने अकोला जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेत एआयएमआयएमसोबत युती केली होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना फटकारल्यानंतर ती युती रद्द करण्यात आली. दरम्यान, अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र आले होते. या निर्णयानंतर, काँग्रेसने त्यांच्या सर्व १२ नगरसेवकांना निलंबित केले. दुसरीकडे भाजपने काँग्रेसच्या त्या १२ नगरसेवकांना भाजपात सामावून घेतलं.

 

Follow Us :GoogleNews