Uddhav-Raj – गेल्या कित्येक दिवसांपासून बाप्पाच्या आगमनासाठी भाविक आतुर होते. अखेर आज लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. लाडक्या बाप्पा जसा सामान्य लोकांच्या घरी विराजमान झाला आहे, तसे तो सेलिब्रेटी, राजकारणी दिग्गज लोकांच्या घरीही विराजमान झाला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी दिड दिवसांचा घरी असतो. बुधवारी (27 ऑगस्ट) मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी उद्धव ठाकरे सहकुंटंब जात शिवसेना गणपतीचं दर्शन घेतलं. दरम्यान, तब्बल 22 वर्षांनी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गणेशोत्सवानिमित्तानं आले होते.
संपूर्ण ठाकरे कुटुंब हजर
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी स्वत: फोन करत उद्धव ठाकरेंना गणपतीला घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. हे आमंत्रण स्वीकारात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे हे बुधवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कुटुंबासह गणपतीचं दर्शन घेतल. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरेही उपस्थित होते. दरम्यान, 2003 मध्ये श्रीकांत ठाकरे यांच्या निधनाच्यावेळी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या आधीच्या निवासस्थानी आले होते. त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी गेले. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते.
खास पदार्थाचा बेत
दुसरीकडे ठाकरे कुटुंब तब्बल 22 वर्षांनंतर एकत्र आल्यामुळं ठाकरे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. तर उद्धव ठाकरेंसाठी खास आहाराचा बेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केला होता. यामुध्ये इडली, उकडीचे मोदक, डोसा, तसेच अन्य पदार्थ बनविण्यात आले होते. राज ठाकरेंच्या घरच्या गणपतीकरता शिवतीर्थ हे अतिशय सुंदर पद्धतीनं सजवल्याचं पाहायला मिळतंय. राज ठाकरे हे दरवर्षी आपल्या घरी असलेल्या चांदीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात. राज ठाकरे याठिकाणी राहायला आल्यावर अनेक राजकीय नेते शिवतीर्थवर येऊन गेले होते.
ठाकरें बंधूं एकत्र येणार?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीची ही तिसरी वेळ आहे. आधी 5 जुलै रोजी वरळी डोममधील मराठी भाषेचा विजयी मोर्चा, त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या होत्या. यानिमित्त राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर गेले होते. दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. तसेच हे दोन बंधू आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.





