बुलढाणा – गेल्या काही महिन्यांपासून बुलढाणा सातत्यानं चर्चेत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात शेगाव परिसरातील काही गावांमध्ये केस गळण्याचे प्रकार सुरु झाल्यापासून बुलढाण्याची चर्चा राज्यभरात होते आहे. या आजाराचे मूळ शोधण्याचा प्रयत्न होत असतानाच याच भागातील काही जणांना नख गळती सुरु झाल्याचा प्रकार समोर आला. शेगावातून या आजाराचं लोण आता मेहकर आणि चिखली तालुक्यातही पसरत चालताना दिसतंय.
यातच आता या परिसरातील नागरिकांच्या हातांना भेगा पडण्याचा प्रकार सुरु झालाय. बुलढाणा जिल्ह्यात सुरु असलेल्या या आजारांचं निदानही अद्याप होत नाहीये. या प्रकरणाची दखल राज्यापासून केंद्रीय आरोग्य विभागानंही घेतली असली तरी भारतीय वैद्यकीय संशोधन विभागाचा निदान करण्याचा अहवासल अद्याप आलेला नाहीये.
हाताला भेगा पडण्याच्या घटनांनी टेन्शन वाढलं?
आधी केसगळती आणि नखगळतीवर असलेल्या या आजाराची आता नवी लक्षण दिसण्यास सुरुवात झालीय. मेहकर तालुक्यातील नागरिकांच्या हाताला भेगा पडत असल्याचा प्रकार समोर आलाय. शेलगाव देशमुख या गावातील 20 ग्रामस्थांना हा आजार झाल्याची नोंद करण्यात आलीय.
नेमक्या कोणत्या आजाराची लक्षणं?
या रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यात बुतांश जणांना इसबगोल या त्वचा विकारांची लक्षणं असल्याचं दिसून आलंय. गेल्या पाच वर्षांपासून ते वर्षभरापर्यंत या रुग्णांना हा आजार झालेला आहे. यातील काही रुग्णांवर बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात त्वचारोग डॉक्टरांकडून उपचार सुरु असल्याचीही माहिती आहे.
या त्वचा आजाराचा पिण्याच्या पाण्यासी काहीही संबंध नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. शरिरातील स्वयंप्रतिकाराच्या कमकुवतपणामुळे हा आजार होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. योग्य उपचार घेतल्यानंतर हा आजार आटोक्यात येईल, घाबरुन जाण्याची गरज नसल्याचंही सांगण्यात आलंय.





