Wed, Dec 31, 2025

Air Pollution: पुण्यात हवा प्रदुषण धोकादायक पातळीवर; नागरिकांच्या आरोग्याला धोका!

Written by:Rohit Shinde
Published:
पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक AQI चांगलाच ढासळला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. कधीकाळी स्वच्छ हवेचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये आता तशी परिस्थिती राहिलेली नाही.
Air Pollution: पुण्यात हवा प्रदुषण धोकादायक पातळीवर; नागरिकांच्या आरोग्याला धोका!

कधीकाळी स्वच्छ हवेचे शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये खरंतर आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. कारण पुणे शहरातील बहुतांश भागातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर आहे. पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक AQI चांगलाच ढासळला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्यस्थितीला कमी अधिक फरकाने देशातील बहुतांश मोठ्या शहरांमध्ये अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांचे आरोग्य चांगलेच धोक्यात असल्याचे यावरून स्पष्ट होते.

पुणे आणि परिसरात हवा प्रदुषण धोकादायक पातळीवर

गेल्या काही महिन्यांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हवामानात प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील हवेची गुणवत्ता अनेक ठिकाणी अतिखराब पातळीवर नोंदवली जात आहे. आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाकड आणि हिंजवडी परिसरातील हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांत गंभीर स्तरावर पोहोचली आहे. या भागात कार्यरत असलेल्या आरएमसी प्रकल्पांमुळे हवेत धुळीचे प्रमाण वाढत असून प्रदूषणात भर पडत आहे. याशिवाय सलग सुट्टीमुळे बाहेर पडलेल्या प्रवाशांच्या वाहनांची संख्या वाढल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. परिणामी, या परिसरातील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) धोकादायक 300 च्या पुढे गेला आहे. डिसेंबरच्या पहिल्याच पंधरवड्यात शहराच्या एक्यूआयने 14 दिवसांपैकी सात दिवस 200 अंकांची मर्यादा ओलांडली होती. यामुळे डिसेंबर महिना सुरू झाल्यापासूनच हवेची पातळी खालावत आहे.

हवेची गुणवत्ता अतिखराब स्तरावर पोहोचल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दीर्घकाळ अशा प्रदूषित वातावरणात राहिल्यास सामान्य नागरिकांनाही श्वसनास अडथळे येऊ शकतात. दमा, श्वसनविकार किंवा ॲलर्जी असलेल्या रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक ठरत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वाढलेल्या प्रदूषणामुळे फुफ्फुसांवर ताण येणे, घसा कोरडा पडणे, सतत खोकला तसेच डोळ्यांत जळजळ होण्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये गंभीर स्थिती आहे. वाकड येथील भूमकरनगर भागात शहरातील सर्वाधिक प्रदूषणाची नोंद झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 242 ते 287 दरम्यान होता. मात्र, शुक्रवारपासून प्रदूषणात लक्षणीय वाढ दिसून आली. शुक्रवारी एक्यूआय 324, शनिवारी 300 तर रविवारी 314 इतका नोंदवण्यात आला.

वाढणारे हवा प्रदूषण चिंतेची बाब; आरोग्य जपा !

वाढणारे हवा प्रदूषण हे आजच्या आधुनिक जीवनातील सर्वांत मोठे आव्हान बनले आहे. औद्योगिकीकरण, वाहनांची वाढ, धूळकण, कारखान्यातून निघणारा धूर आणि कचरा जाळणे यामुळे शहरांमध्ये हवेची गुणवत्ता झपाट्याने खालावत आहे. याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होतो. श्वसनाचे विकार, दमा, हृदयविकार, डोळ्यांचे आजार आणि दीर्घकाळात कर्करोगासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. तसेच पर्यावरणीय समतोल बिघडून हवामान बदलाची गती वाढते. स्वच्छ हवा ही प्रत्येक माणसाचा हक्क आहे, त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर, वृक्षारोपण, हरित ऊर्जा आणि नागरिकांची जबाबदारी या सर्वांनी मिळून प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस प्रयत्न करणे आवश्यक आहे. मानवी जीवनात स्वच्छ हवेचे अनन्यसाधारण महत्व आहे. या अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतातील बहुतांश मेट्रो शहरांमधील हवा प्रदुषणात झालेली वाढ भविष्यातील गंभीर धोके अधोरेखित करत आहे.