Sunetra Pawar’s oath ceremony : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या चौथ्या दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज राजभवनात त्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पाडला. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी…
सुनेत्रा पवार यांच्यानिमित्ताने महाराष्ट्राला पहिल्या उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत. अजित पवारांच्या निधनाला चार दिवस झाले आहेत. तातडीने सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबाबत बोलणं टाळलं. दादांच्या निधनाला अवघे काही दिवस होत नाहीत तोच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी शरद पवार गटातील एकही व्यक्ती उपस्थित नव्हती. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असताना शरद पवारांसह त्यांच्या पक्षातील एकाही व्यक्तीने सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला येणं टाळल्याचं दिसून आलं.
पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा..
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.





