Sunetra Pawar : अजित पवारांच्या हयातीत झाले होते महत्त्वाचे निर्णय; सुनेत्रा पवारांवर दुहेरी संघर्षाचं संकट?

Written by:Smita Gangurde
Published:
अजितदादांच्या निधनानंतर अजित पवारांच्या पक्ष ताब्यात घेण्याचा पवार कुटुंबाचा प्रयत्न सुरु होता असं सांगण्यात येतंय. मात्र त्यापूर्वीच सुनेत्रा पवार आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतलाय.
Sunetra Pawar : अजित पवारांच्या हयातीत झाले होते महत्त्वाचे निर्णय; सुनेत्रा पवारांवर दुहेरी संघर्षाचं संकट?

सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात येतायेत का, असा सवाल या सगळ्या घडामोडीत उपस्थित झालाय. उपमुख्यमंत्रीपदाच्या निर्णयाची घाई केली, असं मत व्यक्त करत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. तर विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित करत अजित पवार हयातीत झालेले निर्णय त्यांच्यावर लादण्यात येतायेत का, असा सवालही उपस्थित होतोय? अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर आता सुनेत्रा पवार यांना कुटुंबात आणि पक्षासाठी असा दुहेरी संघर्ष करावा लागतोय.

विलीनी‍करणाची इच्छा अजित पवारांची – शरद पवार

अजितदादांच्या बंडाच्यावेळी अजित पवार कुटुंबात एकटे पडले होते. दादांचं कुटुंब एकीकडे आणि संपूर्ण पवार कुटुंब दुसरीकडे अशी स्थिती होती. सख्खा धाकटा भाऊ श्रीनिवास पवार यांनी सुद्धा दादांऐवजी काकांसोबत राहणं पसंत केलं. अशीच स्थिती दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांची झाली. मात्र या दुःखातही पतीचं काम टिकवण्याला सुनेत्रा पवारांनी कर्तव्य मानलं आणि जड अंत:करणानं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा निर्णय घाईत झाल्याचं जाहीर भाष्य करत शरद पवारांनी यावर नाराजी व्यक्त केली. सुनेत्रा पवार या राज्याचं आणि पक्षाचं नेतृत्व करण्याइतपत सक्षम आहेत का, असा सवालही कुजबूज मोहिमेतून उपस्थित करण्यात येतोय. त्यातच शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या एका बैठकीचा व्हिडीओही पसरवला गेला, यावर स्पष्टीकरण देण्यात आलं असलं तरी आत्ताच का, असा सवालही करण्यात येतोय. विलीनी‍करणाची इच्छा अजित पवारांची असल्याचंही शरद पवार राष्ट्रवादीकडून सतत सांगण्यात येतंय. मात्र अजित पवारांच्या हयातीत झालेली चर्चा सुनेत्रा पवारांवर लादण्याची घाई केली जातेय का, असाही सवाल उपस्थित होतोय.

सलग उपमुख्यमंत्रीपदीच राहावं लागल्याची खंत दादांच्या मनात

अजित पवारांच्या बंडानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा संघर्ष रंगला होता. त्यावेळी बाहेरच्या पवार असं सांगत शरद पवारांनी सुनेत्रा पवारांवर टीका केली होती. या निवडणुकीत सुनेत्रा पवारांना पराभव स्वीकाराला लागला असला तरी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा कायम राहिली. काही दिवसांतच अजित पवारांच्या पक्षानं त्यांना राज्यसभेची संधी दिली. त्यावरूनही पर्सच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातली जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली होती. एवढंच नाही बारामतीत सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांनी दादांना विधानसभेत आव्हान देण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनीही राष्ट्रवादीत बंडानंतर मुंबईत घेतलेल्या सभेत पक्षात योग्य न्याय मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली होती. 2004 साली राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतला यावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांनी भाजपसोबत जाण्याची तयारी दर्शवली होती. 2019 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच्या शपथविधीबाबतही शरद पवारांनी ऐनवेळी भूमिका बदलली, असा आक्षेपही अजित पवारांनी जाहीर व्यक्त केला होता. त्यामुळे सलग उपमुख्यमंत्रीपदीच राहावं लागल्याची खंत दादांच्याही मनात होती.

अजित पवार यांच्या कुटुंबियात पार्थ पवार यांच्यावरही अन्याय करण्यात आल्याची भावना होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांना दिलेलं तिकिट शरद पवारांना आवडलं नव्हतं. या निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला. त्यावर त्यांचा पराभव धक्कादायक नाही, असं जाहीर विधान शरद पवारांनी केलं होतं. त्यानंतर सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी पार्थ पवारांनी केल्यानंतर पार्थ यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. यासोबतच 2 मे 2023 या दिवशी शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा अचानक केली. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात त्यानंतर नेते-कार्यकर्त्यांनी विरोध करत हा निर्णय मागे घेण्यास पवारांना भाग पाडलं. निर्णय मागे घेताना सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष करत त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारीही शरद पवार यांनी टाकली. यावेळी अजित पवार सगळ्यांना दरडावून समजावत असतानाचे व्हिडीओ त्यानंतर व्हायरल झाले. त्यातून चुकीचा संदेश गेल्याचा आरोप अजित पवारांनी बंडानंतर केला. राजीनामा देण्याचं ते केवळ नाटकं होतं, अशी टीकाही दादांनी केली होती.

एकीकडे रोहित पवार, सुप्रिया सुळे यांच्या स्थिर राजकारणासाठी प्रयत्न करणाऱ्या, युगेंद्रलाही सहजपणे बारामतीतून संधी देणाऱ्या शरद पवारांनी अजित पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याबाबत घेतलेल्या भूमिका नेहमीच वादात राहिल्या. आताही अजितदादांच्या निधनानंतर अजित पवारांच्या पक्ष ताब्यात घेण्याचा पवार कुटुंबाचा प्रयत्न सुरु होता असं सांगण्यात येतंय. मात्र त्यापूर्वीच सुनेत्रा पवार आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतलाय. त्यामुळेच आता सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात येतायेत का, असा सवाल उपस्थित होतोय.