Marathi News

शरद पवारांसह महाराष्ट्रातील 7 खासदार राज्यसभेतून निवृत्त होणार !

Written by:Rohit Shinde
Published:
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ पूर्ण होत असून ते निवृत्त होणार आहेत. देशभरात भाजपचे सर्वाधिक 30 खासदार यंदा राज्यसभेतून निवृत्त होत आहेत.
शरद पवारांसह महाराष्ट्रातील 7 खासदार राज्यसभेतून निवृत्त होणार !

2026 हे वर्ष राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरणार असून, या वर्षात देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यसभेतील सदस्यांची निवृत्ती आणि नव्या निवडणुकांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यंदा राज्यसभेतील एकूण 71 खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापैकी मार्च महिन्यात 1, एप्रिलमध्ये 37, जूनमध्ये 22 तर नोव्हेंबरमध्ये 11 खासदार निवृत्त होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचा देखील समावेश आहे.

शरद पवार राज्यसभेतून निवृत्त होणार !

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार, छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नेते आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह महाराष्ट्रातील एकूण सात राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येत असून, हे सर्व सदस्य राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. देशभरात भाजपच्या सर्वाधिक म्हणजे तब्बल 30 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ याच काळात पूर्ण होत आहे. दरम्यान, 2026 या वर्षात देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर, राज्यसभेतील एकूण 71 खासदारांचा कार्यकाळ याच वर्षी समाप्त होणार आहे. यामध्ये मार्च महिन्यात 1, एप्रिलमध्ये 37, जूनमध्ये 22 तर नोव्हेंबरमध्ये 11 खासदार निवृत्त होणार आहेत.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सातही खासदारांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी पूर्ण होणार आहे. या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. फौजिया खान, भाजपचे डॉ. भागवत कराड , धैर्यशील मोहन पाटील, काँग्रेसच्या रजनी पाटील, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)च्या प्रियंका चतुर्वेदी तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात आगामी काळात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

राज्यसभेतील एकूण 245 जागांपैकी एप्रिल, जून आणि नोव्हेंबर 2026 या कालखंडात 73 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या काळात निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या यादीत केंद्रीय मंत्र्यांपासून ते अनेक ज्येष्ठ आणि प्रभावी नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे सर्वाधिक चर्चेत असलेले नाव असून, त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ 25 जून 2026 रोजी समाप्त होणार आहे. याच कालावधीत देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेही राज्यसभेच्या सदस्यत्वातून निवृत्त होणार आहेत.

अनेक दिग्गज नेत्यांची राज्यसभेतून निवृत्ती

देशाचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ नेते एच. डी. देवेगौडा हे देखील याच कालावधीत राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत. भारतीय राजकारणात सहमतीचे राजकारण, संघराज्यीय मूल्ये आणि अनुभवाधिष्ठित नेतृत्व यांचे प्रतीक मानले जाणारे देवेगौडा यांच्या निवृत्तीमुळे राज्यसभेतील ज्येष्ठ मार्गदर्शक नेतृत्वात एक पोकळी निर्माण होणार आहे. एकूणच, २०२६ मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुका या केवळ नियमित निवडणूक प्रक्रियेचा भाग नसून, त्या देशाच्या राजकीय दिशादर्शक प्रक्रियेला नवे वळण देणाऱ्या ठरण्याची दाट शक्यता आहे. विविध पक्षांसाठी या निवडणुका ताकद आजमावण्याची, नव्या नेतृत्वाला संधी देण्याची आणि संसदेमधील आपली भूमिका अधिक प्रभावी करण्याची महत्त्वाची संधी ठरणार आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews