महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपाची चाचपणी, अमित शाहांच्या दौऱ्यात नेमके काय संकेत?

Written by:Smita Gangurde
Published:
येत्या काही महिन्यात महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाईल, त्यापूर्वी अमित शाह यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. यावेळी त्यांनी महत्त्वाचे संकेत दिल्याचे राजकीय तज्ज्ञांचं निरीक्षण आहे.
महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाजपाची चाचपणी, अमित शाहांच्या दौऱ्यात नेमके काय संकेत?

मुंबई – राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर यासारख्या काही महापालिकांमध्ये भाजपा स्वबळाची चाचपणी करत असल्याचं पाहायला मिळतंय. अमित शाहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय.

अमित शाहा यांनी त्यांच्या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. त्यानंतर स्वबळावर चाचपणी करण्यास त्यांनी भाजपा नेत्यांना सांगितल्याचं सांगण्यात येतंय.

मुंबईत शिंदेंना हव्या आहेत 107 जागा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाहा यांच्या भेटीत मुंबई महापालिकेसाठी 227 पैकी 107 जागांची मागणी केल्याचं सांगण्यात येतंय. शिंदेंच्या बंडांनंतर मुंबई, ठाणे परिसरातील अनेक माजी नगरसेवक हे शिंदे शिवसेनेत गेलेले आहेत. त्यामुळं मुंबईत शिवसेनेचीताकद चांगली असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. अमित शाहा यांनी शिंदे यांचं म्हणणं ऐकून घेतलं मात्र त्यावर कोणताही निर्णय वा शब्द दिलेला नाही असंही सांगण्यात येतंय.

अजितदादांनाही शह देणार

पुणे जिल्ह्यावर अजित पवारांचं वर्चस्व असल्याचं मानण्यात येतं. मात्र पुणे महापालिकेतही भाजपा स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या विरोधात काही आमदारांनी अमित शाह यांची भेट घेऊन त्यांची तक्रार केल्याची माहिती आहे. अजित पवार विरोधकांना बळ देत असल्याचं या आमदारांनी म्हटलंय. त्यावर पक्षाचं काम करा, काळजी करु नका, असं शाहा या आमदारांना म्हणाले आहेत. 2017 साली भाजपानं पुण्यात एकहाती सत्ता मिळवली होती. त्याची पुनरावृत्ती करण्याची भाजपाची रणनीती असल्याची चर्चा आहे.

Follow Us :GoogleNews