फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात घडतात. अनेकदा निष्काळजीपणे फटाके फोडल्यामुळे घरे, दुकाने किंवा वाहने जळतात. या आगींमुळे मालमत्तेचे नुकसान होतेच, पण अनेकांना गंभीर दुखापतीही होतात. फटाके फोडताना सुरक्षित अंतर ठेवणे, मुलांवर लक्ष ठेवणे आणि पाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. पर्यावरणालाही या आगीमुळे आणि धुरामुळे हानी पोहोचते.

त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडताना जबाबदारीने वागावे, अग्निसुरक्षेचे नियम पाळावेत आणि शक्य तितका प्रदूषणमुक्त सण साजरा करावा. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात दिवाळीच्या या काळात फटाक्यांमुळे जवळपास 35 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये आगीच्या घटना

दिवाळीत सोमवारी रात्री फटाक्यांमुळे शहरातील विविध भागात 21 ठिकाणी आगी लागल्या. पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या चार दिवसांत 14 आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील आगींमध्ये मालमत्तेचे नुकसान झाले परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या काळात फटाके उडविताना नागरिकांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बऱ्याचदा अशा आगींमुळे मालमत्तेसोबत मोठी जीवितहानीही अनेकदा होत असते.

दिवाळीत फटाके फोडताना घ्या काळजी

दिवाळीत फटाके फोडताना सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते. फटाके फोडण्यासाठी नेहमी मोकळ्या जागेची निवड करावी आणि घरांच्या किंवा वाहनांच्या जवळ फटाके फोडू नयेत. लहान मुलांनी फटाके फोडताना मोठ्यांच्या उपस्थितीतच फटाके फोडावेत. हातात धरून फटाके फोडणे टाळावे आणि जळालेला फटका लगेच हात लावू नये. अग्निशमन साधनं, पाणी किंवा वाळू जवळ ठेवावी. कपडे सूती घालावेत, कारण नायलॉन कपड्यांमुळे आग लागण्याचा धोका वाढतो. पर्यावरणाचे नुकसान होऊ नये म्हणून कमी आवाजाचे आणि प्रदूषणमुक्त फटाके वापरावेत. जबाबदारीने आणि सुरक्षिततेने सण साजरा करणे हेच खरी दिवाळीची आनंदाची गुरुकिल्ली आहे.