अवघ्या आठवड्याभरावर दिवाळी आली असून घराघरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. साफसफाई, फराळ, कंदील, पणत्या यांचीही खरेदी सुरू आहे. पण दिवाळी म्हटलं की सगळ्यांना सर्वात पहिले आठवतात ते फटाके.. फुलबाजी, भुईचक्र, अनार, लवंगी, सुतळीबॉम्ब असे अनेक फटाके सर्वजण आनंदाने फोडतात. मात्र फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेत मुंबई पोलिसांनी यंदा कडक नियमावली बनविली आहे, त्यासाठी पोलिसांनी चांगलाच प्लॅन आखला आहे.
मुंबई पोलिसांची सर्वत्र करडी नजर
मुंबई पोलिस मुख्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना 15 ते 25 ऑक्टोबर दरम्यान दररोज कारवाईचा अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालात अवैध फटाके विक्रेत्यांवर करण्यात आलेली कारवाई, ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन यासंबंधी माहिती देण्यात येणार आहे.
हे ही वाचा
विनापरवाना फटाके विक्रीस बंदी
दिवाळीच्या आधीच मुंबईतील रस्त्यांवर आणि पदपथांवर फटाकेविक्री करणाऱ्यांवर महापालिकेने कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. रस्त्यांवर फटाकविक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अवैध आणि धोकादायक विक्री थांबवण्यासाठी 15 ऑक्टोबर पासू ते दिवाळी संपेपर्यंत दररोज विशेष मोहीम राबवण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. रस्त्यांवर फटाके विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार, एवढंच नव्हे तर त्यांचा मालही जप्त होणार.
फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण
फटांक्यांमुळे होणारे मोठे प्रदूषण ही दिवाळीच्या सणासोबत येणारी गंभीर समस्या आहे. फटाके फोडल्याने हवेत धूळ, धूर, ध्वनी आणि रासायनिक पदार्थ मोठ्या प्रमाणावर वाढतात, ज्यामुळे वायू प्रदूषण प्रचंड वाढते. यामुळे श्वसनाच्या आजारांचा धोका, हृदयविकाराचा धोका आणि लहान मुलांमध्ये श्वसनाचे त्रास वाढतात. ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक ताण, प्राणी आणि पक्ष्यांवर परिणाम होतो. तसेच, वातावरणात झाकलेला PM2.5 आणि PM10 कणांचा स्तर वाढतो, ज्यामुळे प्रदूषणाचा स्तर दुप्पट किंवा तिप्पट होतो. या कारणांमुळे सल्ला दिला जातो की फटाके मर्यादित प्रमाणात वापरावेत किंवा पर्यावरणपूरक फटाके वापरले जावेत.