भास्कर जाधव विरुद्ध ब्राह्मण संघर्ष वाढला, ब्राह्मणांची माफी मागण्यास जाधवांचा ठाम नकार, राज्यभरात पडसाद उमटणार?

Written by:Smita Gangurde
Published:
एकंदरीतच गुहागरमध्ये सुरू झालेला हा वाद आता केवळ एका विधानापुरता मर्यादित राहिलेला नाही.
भास्कर जाधव विरुद्ध ब्राह्मण संघर्ष वाढला, ब्राह्मणांची माफी मागण्यास जाधवांचा ठाम नकार, राज्यभरात पडसाद उमटणार?

गुहागर – गुहागरच्या हेदवतमधल्या सभेत खोतकीबाबत केलेल्या विधानावरुन ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि ब्राह्मण समाज यांच्यातला वाद आता वाढत चाललाय.

ब्राह्मण सहाय्यक संघाला पत्र लिहून देणारा अनाजी पंत कोण ? असा टोला भास्कर जाधवांनी लगावला होता. यावरुनच राजकारण पेटलं. आता गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांनीही भास्कर जाधवांवर निशाणा साधला

विनय नातू विरुद्ध जाधव संघर्ष

भास्कर जाधव यांना काही जणं सोडून गेले, त्या सभेतुन सगळे सुरु आहे, जातीत तेढ निर्माण करून एक समाज आपल्या मागे राहिल असं पाहिलं गेलं, अशी टीका माजी आमदार विनय नातू यांनी केलीय. अनेक वर्ष विषय चालू आहे, कुणाचा राग कुणावर तरी काढायचं असं सुरु आहे

जातीच्या आधारे घाबरवण्याचे काम सुरु झाले आहे. राजकीय सभा होती, त्यात खोत, ब्राह्मण असं बोलून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधला गेला अशी टीकाही नातूंनी केलीय. तर वक्तव्यावर माफी मागणार नाही, अशी ठाम भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी घेतलीय.

ब्राह्मण महासंघाचा काय इशारा?

भास्कर जाधव हे जातीय द्वेष पसरवत असल्याचा आरोप, ब्राह्मण महासंघाने केलाय. तर पुढच्या वेळी निवडून येणं अवघड होईल, असा इशाराही दिलाय. याला जाधवांनीही प्रत्यु्ततर दिलंय. आपल्याला निवडून येण्याबाबत लोक ठरवतील, अशी प्रतिक्रिया भास्कर जाधवांनी दिलीय.

संपूर्ण महाराष्ट्रात उमटणार पडसाद?

शिवसेना-भाजपा युती होण्यापूर्वी अनेक वर्ष गुहागर मतादरंसघातून विनय नातू हे आमदार म्हणून निवडून येत होते. त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला. या मतदारसंघात त्यामुळे आपसूकच आधीपासून ब्राह्मण विरुद्ध इतर असा एक सुप्त संघर्ष आहे. जाधवांच्या  नव्या वादग्रस्त विधानानं यावरुन राजकारण तापताना पाहायला मिळतंय. त्यात आता ब्राह्मण महासंघचानंही उडी घेतलीय.

एकंदरीतच गुहागरमध्ये सुरू झालेला हा वाद आता केवळ एका विधानापुरता मर्यादित राहिलेला नाही. एका बाजूला जातीच्या राजकारणाचे आरोप होतायत, तर दुसऱ्या बाजूला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रतिवाद केला जातोय. त्यामुळे, आगामी काळात कोकणच्या राजकारणात याचे कसे पडसाद उमटतात, हे आता पाहायचं.

Follow Us :GoogleNews