भिवंडीत महापालिका निकालानंतर भाजपा आणि कोणार्क विकास आघाडीच्या नेत्यांत आणि कार्यकर्त्यांत मोठा राडा झाला. आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर मित यांच्यासह समर्थकांनी माजी महापौर आणि कोणार्क आघाडीचे नेते विलास पाटील यांच्या घरावर हल्ला केला. याविरोधात आंदोलनाला बसलेल्या विलास पाटील आणि समर्थकांवर आमदार चौघुलेंच्या कार्यालयातून दगडफेक करण्यात आली.
भाजपा आमदाराच्या कार्यालयाबाहेर राडा
भिवंडी महापालिकेच्या निवडणूक निकालाचे हे असे पडसाद पाहायला मिळालेत. भिवंडीत प्रतिष्ठेच्या प्रभाग क्रमांक एकच्या लढतीत झालेल्या भाजपच्या पराभवानंतर हा सगळा प्रकार घडला. कोणार्क विकास आघाडीचे नेते, माजी महापौर विलास पाटील यांचा मुलगा मयुरेश पाटील यांनी भाजपा आमदार महेश चौघुले यांचा मुलगा मित चौघुले यांचा पराभव केला होता. त्यानंतर दोन दिवसांपासून वातावरण तापलेलं होतं. त्यातच रविवारी संध्याकाळी मित चौघुले यांच्या समर्थकांनी माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर हल्ला करत दगडफेक केली. यावेळी काही कार्यकर्त्यांवर चाकू हल्लाही करण्यात आला. त्यानंतर या हल्ल्याविरोधात विलास पाटील समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केलं. या चौकासमोर असलेल्या आमदार महेश चौघुले यांच्या कार्यालयातून जमलेल्या जमावानं यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही गट एकमेकांवर धावून गेले. भाजपा आमदाराच्या कार्यालयाबाहेर राडा झाला. आमदार महेश चौघुले यांचे कार्यालयातून कोणार्कच्या आंदोलकांवर दगडफेक करण्यात आली. यावेळी सोडा वॉटर बॉटल याचा माराही करण्यात आला. त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी लाठीमार करत दोन्ही बाजूकडील जमाव बाजूला केला. यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.
संघर्षाचे पडसाद येत्या काळात भिवंडीत उमटण्याची शक्यता
यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा भिवंडीत तैनात करण्यात आला आहे. भाजप कार्यालयातून झालेल्या दगडफेकीत दोन जण जखमी झाले असून माजी महापौर प्रतिभा पाटील या सुद्धा जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना शांततेचं आवाहन केलं. तसचं या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येईल, असंही स्पष्ट केलंय. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतरही संघर्ष किती विकोपाला जाऊ शकतो हेच या घटनेनं दाखवून दिलंय. या संघर्षाचे पडसाद येत्या काळात भिवंडीत उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





