Marathi News
Sun, Jan 11, 2026

महापालिका निवडणुकीनंतर पंतप्रधानांच्या हस्ते धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन, मुख्यमंत्री म्हणाले…

Written by:Smita Gangurde
Published:
पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार असलं तरी या कामासाठी पुढची काही वर्ष वाट पाहावी लागेल. या  काळात या मुद्द्यावरुन अधिक जोरदार राजकारणही रंगण्याची शक्यता आहे. 
महापालिका निवडणुकीनंतर पंतप्रधानांच्या हस्ते धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन, मुख्यमंत्री म्हणाले…

मुंबई – आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा पुनर्विकास आता लवकरच होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या प्रकल्पाची केवळ चर्चा सुरु होती, यावरुन जोरदार राजकारणही रंगलं. मात्र आता हे पुनर्वसन प्रत्यक्ष होईल असं दिसतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीनंतर या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात येईल, अशी घोषणाच केली आहे.

धारावीचा पुनर्विकास करताना प्रत्येक पात्र आणि अपात्र लोकांना घरे देणारा हा पहिलाच प्रकल्प असेल असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. यातील पात्र नागरिकांचं पुनर्वसन हे धारावतीच होईल, तसचं धारावीतील सर्व उद्योग आणि व्यवसाय हे धारावीतच राहतील, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

जमीन खासगी व्यक्तीला दिलेली नाही- मुख्यमंत्री

धारावीची जमीन खासगी व्यक्तीला दिल्याचा अपप्रचार करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. कुणी खासगी व्यक्ती नव्हे तर राज्य सरकार, एसआरए यांची भागिदारी असलेली डीआरएएल ही कंपनी हा पुनर्विकास करत असल्याचं सांगत त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिलंय.

मुंबई कोणत्याही खासगी व्यक्तीला आंदण दिलेली नाही, त्याची शक्यताही नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. त्यासोबतच विरोधक याबाबत करत असलेल्या अपप्रचाराला बळी पडू नका, असं आवाहनही त्यांनी मुंबईकरांना केलंय.

अदानींच्या नावे विरोधकांचं टीकास्त्र

मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका ठाकरे युतीकडून सातत्यानं करण्यात येते आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं कंत्राट हे अदानींच्या कंपनीला मिळालेलं आहे. या मोबदल्यात त्यांना जास्त एफएसआय सरकारनं दिलाय. त्यामुळं भविष्यात अदानी हे मुंबईतील बिल्डरांना एफएसआय देणार असून मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका विरोधक सातत्यानं करतायेत. मात्र मुंबई एखाद्या खासगी व्यक्तीला आंदण देणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठासून सांगितलेलं आहे.

धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचा प्रकल्प हा सर्वात मोठा प्रकल्प असेल. पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार असलं तरी या कामासाठी पुढची काही वर्ष वाट पाहावी लागेल. या  काळात या मुद्द्यावरुन अधिक जोरदार राजकारणही रंगण्याची शक्यता आहे.