श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी आणि त्यांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी अधिक काळ खुले राहणार आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदीराच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. दर्शनाच्या वेळेत मोठा बदल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दर्शनाच्या वेळेत मोठा बदल

हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला 25 जुलैपासून सुरुवात होत आहे. या महिन्यात महादेवाची पूजा केली जाते. या काळात बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. याच पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी आणि त्यांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी अधिक काळ खुले राहणार आहे.

पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत दर्शन

श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरात गर्दी झाल्यानंतर दर्शनासाठी अधिक वेळ लागतो. आणि ही बाब लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय गेतला आहे. श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर दररोज पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. यामुळे भाविकांना दर्शनासाठी पुरेसा वेळ मिळेल. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी नेहमीच जास्त असते. ही बाब लक्षात घेऊन, प्रत्येक श्रावण सोमवारी मंदिर पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शनासाठी उघडं राहणार आहे. यामुळे सोमवारी येणाऱ्या भाविकांनाही लवकर दर्शन घेता येईल.

पोलिसांच्या भाविकांना नेमक्या काय सूचना?

पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार, भाविकांनी त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येताना मौल्यवान वस्तू, दागिने, मोठी रोकड इत्यादी सोबत आणू नयेत. तसेच शक्यतो कमीत कमी सामान घेऊन यावे. गर्दीच्या ठिकाणी अनोळखी व्यक्तींशी जास्त संवाद न साधणे आणि आपल्या वस्तूंची काळजी घेणे आवश्यक असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मंदिरात प्रवेश करताना भाविकांना मोठ्या बॅगा, पिशव्या घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. हे पाऊल सुरक्षेच्या दृष्टीने उचलण्यात आले आहे. कारण गर्दीच्या ठिकाणी संशयास्पद वस्तूंमुळे गोंधळ किंवा असुरक्षित वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते.

त्यामुळे मंदिर परिसरात आणि गर्दीच्या मार्गांवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.तसेच भाविकांना जर कुठेही बेवारस किंवा संशयास्पद वस्तू आढळल्या, तर त्यास हात लावू नये आणि तात्काळ पोलिसांना कळवावे. सुरक्षेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.गर्दी व्यवस्थापनासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही निगराणी, वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि आपत्कालीन सेवा सज्ज ठेवण्यात आली आहे.