भारतीय रेल्वेला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते कारण ती स्वस्त, सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाचे माध्यम आहे. रेल्वेच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात सहज पोहोचता येते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे सर्वात किफायतशीर पर्याय मानली जाते. प्रवाशांना स्लीपर, एसी, जनरल अशा विविध श्रेणींमध्ये प्रवासाची सुविधा मिळते. ऑनलाइन तिकीट बुकिंग, खाद्यसेवा, स्वच्छता आणि वेळेवर धावणाऱ्या गाड्या यामुळे रेल्वेवरील विश्वास वाढला आहे. ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणाऱ्या या सेवेमुळे भारतीय रेल्वे ही केवळ वाहतुकीचे साधन नसून देशाच्या प्रगतीचे प्रतीक बनली आहे. मात्र आता रेल्वेने प्रवाशांना अचानक चांगलाच धक्का दिला आहे. कारण, तिकीट दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय रेल्वेचे प्रवास भाडे वाढणार !
भारतीय रेल्वेनं रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा रेल्वे मंत्रालयाकडून आज करण्यात आली आहे. रेल्वेनं नव्य दरांची अंमलबजावणी येत्या 26 डिसेंबरपासून करण्यात येणार असल्याचं म्हटलं. रेल्वेचा खर्च आणि प्रवाशांवरील खर्चाचा भार याचं संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं भारतीय रेल्वेनं म्हटलं. भारतीय रेल्वेनं उपनगरीय सेवा आणि मासिक सिझन तिकीटाच्या दरात वाढ केलेली नाही. याशिवाय ऑर्डिनरी क्लास म्हणजेच जनरल तिकीटावर प्रवास करणाऱ्यांसाठी 215 किमीपर्यंत कोणतेही दर वाढवण्यात आलेले नाहीत.
जनरल तिकीटाचे दर 215 किमीपासून पुढील अंतरासाठी प्रति किलोमीटर 1 पैसा अशा प्रकारे वाढवण्यात आले आहेत. मेल आणि एक्सप्रेस नॉ एसीसाठी 2 पैसे प्रति किमीची वाढ करण्यात आली आहे. तर, वातानुकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति किमी 2 पैसे अधिक मोजावे लागतील. रेल्वेनं प्रवास भाडेवाढ करताना आर्थिक स्थिती समोर मांडली आहे. प्रवास भाडे वाढवल्यानं रेल्वेला या वर्षात 600 कोटी रुपये मिळणार आहेत. 500 किलोमीटर पर्यंतच्या अंतरात नॉन एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 10 रुपये अधिक द्यावे लागतील.
रेल्वेने अचानक भाडेवाढ का केली ?
गेल्या 10 वर्षात रेल्वेनं नेटवर्क आणि पायाभूत सुविधा वढवल्या आहेत. चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. मनुष्यबळात वाढ केल्यानं खर्च 1,15,000 कोटी रुपयांनी वाढला आहे. पेन्शनवरील खर्च देखील 60 हजार कोटींनी वाढला आहे. 2024-25 मधील रेल्वे चालवण्याचा खर्च 263000 कोटी रुपये झाला आहे. रेल्वेनं वाढता मनुष्यबळ खर्च भागवण्यासाठी मालवाहतूक वाढवण्याकडे लक्ष दिलं आहे. त्यामुळं प्रवास भाडं कमी प्रमाणात वाढवण्यात आल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या प्रयत्नांमुळं सुरक्षा वाढेल आणि रेल्वे सेवेची गुणवत्ता वाढेल.
भारतीय रेल्वेनं 2025 मध्ये दुसऱ्यांदा प्रवास भाडे वाढवलं आहे. यापूर्वी जून महिन्यात रेल्वेनं प्रवासभाडे वाढवण्याचा निर्णय घेतला होता. 1 जुलै 2025 पासून रेल्वे प्रवास भाडे वाढवण्यात आले होते. त्यानंतर आता पाच महिन्यातच रेल्वेनं प्रवास भाडे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. उपनगरीय रेल्वे आणि मासिक सिझन तिकीट म्हणजेच एमएसटीचे दर वाढवण्यात आलेले नाहीत. त्यामुळं मुंबईकरांना मात्र दिलासा कायम आहे.





