संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. यामध्ये श्रीवर्धन नगरपालिकेत एक रंजक गोष्ट घडताना दिसली. याठिकाणी ठाकरे गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतुल चौगुले हे विजयी झाले. मात्र, त्यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर काहीवेळातच ते एकनाथ यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
श्रीवर्धन नगरपालिकेत मोठा उलटफेर
श्रीवर्धन नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी अतुल चौगुले हे दणदणीत मतांनी विजयी झाले. मात्र सुनील तटकरे यांच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी शिंदे सेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला पडद्याआडून मदत केली. दोन्ही शिवसेनेने एकत्र येऊन तटकरे यांच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली.
“आमदार भरतशेठ गोगावले, स्थानिक नेते अनिल नवगणे तसेच सेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्यामुळे माझा विजय झाला. या सगळ्यांनी मला लाखमोलाचे सहकार्य केले. माझा विजय हा शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांचा आहे. शिवसैनिक हा शिवसैनिक असतो. सगळ्यांनीच माझ्या विजयासाठी अतोनात कष्ट केले. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक झाली. या निवडणुकीत जनशक्तीच्या पाठिंब्यावर माझा विजय झाला.” अशी प्रतिक्रिया चौगुले यांनी दिली.
अतुल चौगुले लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत
वरिष्ठांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, आमच्याकडे प्रवेश करण्यासाठी त्याचीही मानसिकता आहे, असे आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितले. याचाच अर्थ चौगुले यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचेच थेटपणे त्यांनी संकेत दिला. त्यामुळे अतुल चौगुले लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होतील हे यावरून स्पष्ट झाले आहे.





